कोल्हापूर : अंबाबाईला आज इरलं पांघरणार
By admin | Published: September 20, 2014 12:08 AM2014-09-20T00:08:03+5:302014-09-20T00:27:28+5:30
शारदीय नवरात्रोत्सव : मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता; दर्शनासाठी सरस्वती मंदिराजवळ उत्सवमूर्ती ठेवणार
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंंबाबाई मंदिराच्या स्वच्छतेला वेग आला असून, उद्या (शनिवार) मुख्य गाभाऱ्याची स्वच्छता होणार आहे. देवीच्या मूळ मूर्तीला इरलं पांघरण्यात येईल.
तर भाविकांना दर्शनासाठी सरस्वती मंदिराजवळ उत्सवमूर्ती ठेवली
जाईल. ज्या दिवशी मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता केली जाते, त्यादिवशी अंबाबाईच्या मूर्तीला इरलं पांघरले जाते. वर्षातून एकदा हे इरलं पांघरण्याची पद्धत आहे. उद्या पहाटेचा अभिषेक झाल्यानंतर गाभाऱ्याच्या स्वच्छतेला सुरुवात होईल. या स्वच्छतेत संजय मेंटेनन्सच्या कर्मचाऱ्यांसह श्रीपूजकदेखील सहभाग घेतात. भाविकांना देवीचे दर्शन घेता यावे यासाठी अंबाबाईची उत्सवमूर्ती सरस्वती मंदिराशेजारी ठेवण्यात येणार आहे. स्वच्छतेचे काम संपल्यानंतर संध्याकाळी ६ वाजता अभिषेक करून अंबाबाईच्या मूळ मूर्तीची अलंकार पूजा बांधली जाईल. त्यानंतर
देवीची उत्सवमूर्ती पुन्हा गाभाऱ्यात येईल. (प्रतिनिधी)
एक्स-रे
स्कॅनरची
शक्यता
धूसरच..
देवस्थान समितीने प्रसिद्ध केलेल्या निविदांना प्रतिसाद मिळत नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मंदिराच्या सुरक्षेसाठी समितीच्यावतीने दोन एक्स-रे स्कॅनर खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीला केवळ एका कंपनीने प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, आज सायंकाळी साडेसहा वाजता जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी अंबाबाई मंदिराची तसेच त्र्यंबोली पालखी व नगरप्रदक्षिणा मार्गाची पाहणी केली. सीसीटीव्ही कॅमेरांचे रेकॉर्डिंग व्यवस्थित होते का याचीही तपासणी केली. उत्सव काळात भवानी मंडप परिसरातील पार्किंग मेन राजाराम हायस्कूलच्या ग्राऊंडवर करण्यात येणार आहे. या पार्किंगच्या ठिकाणाचीही व्यवस्था पाहिली. येत्या काही दिवसात मंदिराच्या आवारात व बाह्य परिसरात सात कॅमेरे छुप्या पद्धतीने लावण्यात येणार आहेत. ज्यांचे प्रक्षेपण ठराविक पोलीस अधिकाऱ्यांच्या मोबाईलवरच सुरू राहील. याशिवाय सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात येणार आहे. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकित गोयल, शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते उपस्थित होते.