‘स्वच्छता दर्पण’मध्ये अव्वल जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 01:08 PM2020-01-07T13:08:26+5:302020-01-07T13:10:18+5:30
‘स्वच्छता दर्पण’ या स्पर्धेमध्ये भारतामधील अव्वल १0 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरचा समावेश करण्यात आला आहे. रविवार (दि. १२) दिल्ली येथे होणाऱ्या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचाही गौरव करण्यात येणार आहे.
कोल्हापूर : ‘स्वच्छता दर्पण’ या स्पर्धेमध्ये भारतामधील अव्वल १0 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरचा समावेश करण्यात आला आहे. रविवार (दि. १२) दिल्ली येथे होणाऱ्या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचाही गौरव करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयामार्फत वर्ष २0१९-२0 मध्ये स्वच्छता आणि हागणदारीमुक्ती अंतर्गत येणाऱ्या मुद्यांच्या अनुषंगाने ‘स्वच्छता दर्पण २0१९’ ही आॅनलाईन गुणांकन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या गुणांकन स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्हा देशातील अव्वल १0 जिल्ह्यांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. गुणांकनामध्ये देश स्तरावर अव्वल जिल्ह्यांमध्ये स्थान मिळविणारा कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील एकमेव जिल्हा आहे.
हागणदारीमुक्त झालेल्या आणि हागणदारीमुक्त न झालेल्या राज्यांसाठी स्वतंत्र गुणांकन पद्धती तयार करण्यात आली होती. यामध्ये गाव पातळीवरील अभियान अंतर्गत झालेले काम, जिल्ह्यांच्या विविध कामांतील प्रगतीचे मुद्दे विचारात घेऊन आॅनलाईन प्रणालीवर नोंद करण्यात आलेल्या अहवालाच्या अनुषंगाने गुणांकन करण्यात आले आहे; यासाठी १ जून २0१९ ते ३१ डिसेंबर २0१९ पर्यंत आॅनलाईन गुणांकन प्रक्रियेची नोंद घेण्यात आली आहे.
स्वच्छता दर्पण गुणांकन पद्धतीमध्ये हागणदारीमुक्त गाव, शौचालय बांधकाम आणि वापर, गावांची पडताळणी, शौचालय बांधकाम जिओ टॅगिंग, आर्थिक प्रगती नोंद करणे, तसेच गावस्तरावरील जनजागृती उपक्रम, श्रमदान, लोकसहभाग आणि सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या घटकांवर आधारित आॅनलाईन गुणांकन प्रणालीवर माहिती भरण्यात आली होती.
जिल्हा परिषदेच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. सर्व पदाधिकारी, अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छाग्रही व इतर सर्व कर्मचारी यांनी घेतलेले कष्ट आणि केलेले नियोजनबद्ध काम यामुळे हे यश मिळाले.