शिवाजी विद्यापीठाचा वर्धापनदिन : गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवकांच्या पुरस्काराची रक्कम वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:43 PM2018-11-16T12:43:41+5:302018-11-16T12:46:20+5:30
शिवाजी विद्यापीठाच्या वर्धापनदिनी विविध पुरस्कारांचे वितरण केले जाते. त्यातील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवकांच्या पुरस्काराची रक्कम विद्यापीठाने वाढविली आहे. त्याची अंमलबजावणी यावर्षीपासून होणार आहे. विद्यापीठाचा ५६ वा वर्धापनदिन रविवारी (दि. १८) सकाळी पावणेनऊ वाजता साजरा होणार आहे. त्याची तयारी सुरू आहे.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वर्धापनदिनी विविध पुरस्कारांचे वितरण केले जाते. त्यातील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवकांच्या पुरस्काराची रक्कम विद्यापीठाने वाढविली आहे. त्याची अंमलबजावणी यावर्षीपासून होणार आहे. विद्यापीठाचा ५६ वा वर्धापनदिन रविवारी (दि. १८) सकाळी पावणेनऊ वाजता साजरा होणार आहे. त्याची तयारी सुरू आहे.
गेल्या ५५ वर्षांपासून विद्यापीठातर्फे पुरस्कारांचे वितरण केले जाते. आतापर्यंत विद्यापीठातील आणि संलग्न महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवकांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराची रोख रक्कम एक हजार रुपये होती. त्यामध्ये विद्यापीठाने आता वाढ करून, ती रक्कम पाच हजार इतकी केली आहे.
विद्यापीठातील शिक्षक व प्रशासकीय सेवकांची शैक्षणिक गुणवत्ता संपादन केलेल्या पाल्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकाच्या रकमेतदेखील वाढ करण्यात आली आहे. बॅ. पी. जी. पाटील आदर्श शिक्षक, प्राचार्या सुमतीबाई पांडुरंग पाटील आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त शिक्षकांना देण्यात येणाऱ्या रोख रकमेत वाढ केलेली नाही.
कुलगुरू पी. पी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती
यावर्षीच्या वर्धापनदिनासाठी जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील प्रमुख उपस्थित असणार आहेत. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात सकाळी पावणेनऊ वाजता होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे असणार आहेत. या कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरण होईल. यापूर्वी सकाळी साडेआठ वाजता ध्वजवंदन होणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली.