कोल्हापूर : आयुक्तांच्या ठोस भूमिकेमुळे ‘अमृत’ला बळ, कोट्यवधीचा निधी सत्कारणी लागण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 11:16 AM2018-04-09T11:16:02+5:302018-04-09T11:16:02+5:30

कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी ‘अमृत’ योजनेअंतर्गत कोल्हापूर शहरात झालेल्या अशास्त्रीय वृक्षारोपणाची दखल घेऊन याबाबत नेमकी कामाची दिशा ठरवून संवेदनशीलता दाखवून दिली आहे.

Kolhapur: 'Amrit' will be strengthened due to the solid stand of the Commissioner, crores of rupees need to be appreciated. | कोल्हापूर : आयुक्तांच्या ठोस भूमिकेमुळे ‘अमृत’ला बळ, कोट्यवधीचा निधी सत्कारणी लागण्याची गरज

कोल्हापूर : आयुक्तांच्या ठोस भूमिकेमुळे ‘अमृत’ला बळ, कोट्यवधीचा निधी सत्कारणी लागण्याची गरज

Next
ठळक मुद्दे आयुक्तांच्या ठोस भूमिकेमुळे ‘अमृत’ला बळकोट्यवधीचा निधी सत्कारणी लागण्याची गरज

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी ‘अमृत’ योजनेअंतर्गत कोल्हापूर शहरात झालेल्या अशास्त्रीय वृक्षारोपणाची दखल घेऊन याबाबत नेमकी कामाची दिशा ठरवून संवेदनशीलता दाखवून दिली आहे.

गेली अनेक वर्षे सर्वत्रच केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून वृक्षारोपणाची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतल्या जातात. मात्र, झाडे लावल्यानंतर ती जगली की नाही याची अनेकदा खात्री केली जात नाही.

या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यांत शहरातील बेलबागेतील खणीशेजारी सहा, सात फूट उंचीची झाडे आणून ठेवली गेली. चारच दिवसांत पावला-पावलाला झाडे लावण्यात आली आणि भरउन्हाळ्यात वृक्षारोपण कसे सुरू आहे याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली.

जागरूक नागरिकांनी हा प्रकार समोर आणल्यानंतर ‘लोकमत’ने मालिकेच्या माध्यमातून कोल्हापूर शहरात वृक्षारोपण व अनुषंगिक कामांवर खर्च झालेले १ कोटी रुपये, आता खर्च होऊ घातलेले १ कोटी ६२ लाख रुपये आणि २ कोटी रुपयांचे संभाव्य नियोजन याची मांडणी करून हा निधी सत्कारणी लागावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या संपूर्ण प्रकाराची दखल घेऊन आयुक्तांना पत्र दिले. महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेचे ‘सदिच्छा दूत’ डॉ. मधुकर बाचूळकर, जैवविविधता समिती आणि वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य उदय गायकवाड, अनिल चौगुले यांनी याबाबतची मते मांडली. परिणामी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी या सर्व ठिकाणांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला.

केवळ एकटेच जाऊन पाहणी करण्यापेक्षा महापालिकेचे अधिकारी, कंत्राटदार, सल्लागार, पर्यावरण अभ्यासक अशा सर्वांना घेऊन अडीच तास ही पाहणी केल्यानंतर ‘लोकमत’ने मांडलेल्या मुद्द्यांवर शिक्कामोर्तब झाले आणि म्हणूनच चुकीच्या ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या दुरूस्त करण्याचाही निर्णय झाला.

अरे, नर्सरी केलीय काय

मंगळवार पेठेतील बेलबागेत खणीजवळ पावला-पावलावर झाडे लावल्याचे ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. मात्र महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने ‘आम्ही चार ते पाच फुटांवर झाडे लावली आहेत,’ असे ठामपणे सांगितले होते. मात्र, हेच अधिकारी बेलबागेत गाडीतून उतरल्यानंतर त्यांनी ‘अरे, झाडं लावलाय का नर्सरी केलायं’ असे उद्गार काढले आणि अखेर येथील काही झाडे काढून दुसरीकडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

ह्याचे लॉजिक काय?

आयुक्त डॉ. चौधरी यांनी एकेठिकाणी कंत्राटदारांना बोलावून ‘एवढ्या मोठ्या झाडाखाली ही झाडे लावण्यापाठीमागचे तुमचे लॉजिक काय,’ अशी स्पष्ट विचारणा केली. तुम्ही किती झाडे लावली या आकड्यांची काळजी करू नका. योग्य अंतरावर झाडे लावा, जगवा. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आज जी चर्चा झाली त्यात ज्या सूचना केल्या आहेत त्याचे प्रोसिडिंग करा, अशा सूचनाही डॉ. चौधरी यांनी सल्लागारांना केल्या. मी स्वत: पुन्हा या सर्व ठिकाणांची पाहणी करणार आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
 

 

Web Title: Kolhapur: 'Amrit' will be strengthened due to the solid stand of the Commissioner, crores of rupees need to be appreciated.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.