Kolhapur: वेदगंगा नदीत उडी घेणाऱ्या वृद्धाला रोखले, अबोल वृद्धा मुळे पोलिसांसमोर पेच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 11:55 PM2024-07-21T23:55:55+5:302024-07-21T23:56:14+5:30
Kolhapur News: आदमापूर येथील बाळूमामा दर्शनासाठी आलेल्या तरुणांनी जर चपळता दाखवली नसती तर हा वृद्ध हा वेदगंगेच्या विस्तीर्ण पुराच्या पाण्यातून कुठे वाहत गेला असता याचा पत्ता ही लागला नसता.
- अनिल पाटील
मुरगूड - दुपारी साडे तीनची वेळ! एक सारखा कोसळणारा धुवांधार पाऊस!सर्वत्र पसरलेले महापुराचे पाणी!मुरगूड निढोरी दरम्यान असणाऱ्या पुलावरचे ठिकाण!एखाद्या चित्रपटातचे शूटिंग सुरू आहे असाच प्रसंग! साठीतील एक वृद्ध वेदगंगा नदीवरील पुलावर मधोमध येतो, हातातील पिशवी कडेला ठेवून चपला काढून नदीच्या पाया पडून क्षणार्धात संरक्षक कठड्यावर चढतो..! प्रचंड वेगाने वाहणाऱ्या आणि काठोकाठ भरलेल्या नदीच्या पात्रात उडी मारणार इतक्यात जवळील तरुण धावतात आणि त्याला पकडून खाली ओढतात..! एक जीव वाचला पण पुढं काय....?
ही घटना मन सुन्न करणारी आहे. ही अनोळखी वृद्ध कोठून आला आहे.त्याचे नाव गाव याचा काही ही पत्ता नाही.जवळ कोणताच ओळखीचा पुरावा नाही.आदमापूर येथील बाळूमामा दर्शनासाठी आलेल्या तरुणांनी जर चपळता दाखवली नसती तर हा वृद्ध हा वेदगंगेच्या विस्तीर्ण पुराच्या पाण्यातून कुठे वाहत गेला असता याचा पत्ता ही लागला नसता.मृतदेह ही मिळाला नसता.तरुणांनी दाखवलेल सामाजिक भान नक्कीच कौतुकास्पद आहे. या वृद्ध व्यक्तीला सावरून त्याची अदबीने चौकशी करण्याचा प्रयत्न केला पण मला सोडा, मला सोडा इतकेच शब्द त्या वृद्धांच्या तोंडातून बाहेर पडत होते.गाव नाव याबाबत तो चकार शब्द बोलत नाही.त्याला आठवत नाही की सांगायचेच नाही हेही समजत नव्हते.त्यामुळे या तरुणांनी तात्काळ मुरगूड पोलिसांशी सम्पर्क साधून घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या वृद्धाला ताब्यात घेतले.सांयकाळ पासून पोलिसांनी ही कसून चौकशी केली पण त्यांची कोणतीच ओळख मिळत नाही.भाषेवरून ही व्यक्ती सीमा भागातील असावी असा अंदाज पोलीस वर्तवत आहेत.रात्री उशिरा पर्यंत पोलिसांनी ही अनेक सामाजिक संस्थेशी संपर्क केला आहे पण कोठून ही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांनी सांगितले.दरम्यान जर ही व्यक्ती ओळखीची वाटल्यास तात्काळ मुरगूड पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.