कोल्हापूर : आनंदवनातील ‘आनंद’ कुष्ठरोगापेक्षा जास्त संसर्गजन्य : डॉ. प्रकाश आमटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 03:51 PM2019-01-08T15:51:20+5:302019-01-08T15:53:50+5:30
कुष्ठरोगाबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. हा रोग संसर्गजन्य आहे, असे म्हणतात; पण बाबा आमटे यांनी आनंदवन येथे कुष्ठरोग्यांसाठी काम सुरू केले; त्यामुळे आनंदवनातील आनंद कुष्ठरोगापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे, अशा भावना डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी रविवारी येथे व्यक्त केल्या. जिल्ह्यातील सर्व फिजिशियन्ससाठी असोसिएशन आॅफ फिजिशियन्स आॅफ इंडिया कोल्हापूर शाखेच्या वतीने कॅपिकॉन २०१९ या वैद्यकीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांचा मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.
कोल्हापूर : कुष्ठरोगाबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. हा रोग संसर्गजन्य आहे, असे म्हणतात; पण बाबा आमटे यांनी आनंदवन येथे कुष्ठरोग्यांसाठी काम सुरू केले; त्यामुळे आनंदवनातील आनंद कुष्ठरोगापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे, अशा भावना डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी रविवारी येथे व्यक्त केल्या. जिल्ह्यातील सर्व फिजिशियन्ससाठी असोसिएशन आॅफ फिजिशियन्स आॅफ इंडिया कोल्हापूर शाखेच्या वतीने कॅपिकॉन २०१९ या वैद्यकीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांचा मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.
डॉ. आमटे म्हणाले, ‘कुष्ठरोगी लोकांचे आयुष्य आम्ही जवळून पाहिले. यानंतर हेमलकसा येथे आदिवासी लोकांसाठी काम सुरू केले. या कामाला वैज्ञानिक जोड मिळावी म्हणून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. अशा लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा विश्वास मिळविणे गरजेचे होते. मंत्र- तंत्र, नरबळी यातून त्यांना बाहेर काढणे गरजेचे होते. पर्याय दिल्याने विरोधही कमी झाला.
लोकांच्या विश्वासामुळे सर्व रोगांवर उपचार करणे शक्य झाले. बाळंतपण, फॅक्चर, नेत्ररोग कोणत्याही प्रकारची परिस्थिती येत होती, त्यावेळी आम्ही यातील स्पेशालिस्ट नाही, असे म्हणता नाही आले. आज आनंदवन आणि हेमलकसाचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आमटे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीने या कार्यात वाहून घेतले आहे.’
डॉ. मंदाकिनी आमटे यांनी मनोगत व्यक्त केले. याचबरोबर परिषदेत निरनिराळ्या चर्चासत्रामध्ये प्रख्यात विशेष तज्ज्ञ डॉ. कन्नन सुब्रमण्यम, डॉ. साजीव बाबू, डॉ. अंजली भट्ट, डॉ. मदन बहादुर, डॉ. शर्वील गाढवे, डॉ. अर्जुन आडनाईक, डॉ. चंद्रशेखर पाटील या तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी असोसिएशन आॅफ फिजिशियन्स आॅफ इंडिया कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष तन्मय व्होरा, उपाध्यक्ष डॉ. अमृत सुलताने, मानद सचिव डॉ. प्रकाश शारबिद्रे, संयुक्त सचिव डॉ. राहुल दिवाण, कोषाध्यक्ष डॉ. अमोल खोत, डॉ. साईप्रसाद, डॉ. अशोक भूपाळी उपस्थित होते. या परिषदेसाठी जिल्ह्यातून तसेच पश्चिम महाराष्ट्रातून ३०० पेक्षा जास्त चिकित्सक उपस्थित राहिले होते.
तरुण समाजसेवेचे व्रत...
तरुण पिढी चंगळवादी आहे, असे म्हणतात; पण आम्हाला उलट अनुभव आहे. आज हजारो तरुण समाजसेवेचे व्रत घेऊन येथे काम करत आहेत, असेही डॉ. आमटे यांनी आवर्जून नमूद केले.