कोल्हापूर :...तर मैलामिश्रित पाण्याने आयुक्त, जल अभियंत्यांना अंघोळ घालू. शिवसेनेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 06:03 PM2017-12-22T18:03:51+5:302017-12-22T18:15:32+5:30
जयंती नाल्यातून मैलामिश्रित सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी तुटून शंभर दिवस उलटले तरी अद्याप तिच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. हे काम ८ जानेवारीपर्यंत पूर्ण न झाल्यास १० जानेवारीनंतर आयुक्त व जल अभियंत्यांच्या कार्यालयात घुसून त्यांना या मैलामिश्रित पाण्याने अंघोळ घालू, असा इशारा शुक्रवारी शिवसेनेतर्फे देण्यात आला.
कोल्हापूर : जयंती नाल्यातून मैलामिश्रित सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी तुटून शंभर दिवस उलटले तरी अद्याप तिच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. हे काम ८ जानेवारीपर्यंत पूर्ण न झाल्यास १० जानेवारीनंतर आयुक्त व जल अभियंत्यांच्या कार्यालयात घुसून त्यांना या मैलामिश्रित पाण्याने अंघोळ घालू, असा इशारा शुक्रवारी शिवसेनेतर्फे देण्यात आला.
जयंती नाल्यापासून महापालिकेपर्यंत पदयात्रा काढून महापालिका चौकात मैलामिश्रित पाण्याचे कलश व फुले ठेवून आयुक्त व जल अभियंत्यांचे उपहासात्मक अभिनंदन करण्यात आले.
दुपारी एकच्या सुमारास जयंती नाला येथे शिवसैनिक एकवटले. येथून मैलामिश्रित पाण्याचे कलश घेऊन जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिक घोषणाबाजी करीत पदयात्रेद्वारे निघाले.
सीपीआर चौकमार्गे ही पदयात्रा महापालिकेत नेण्यात आली. या ठिकाणी ‘आयुक्त, चले जाव...’ अशी घोषणाबाजी करीत निषेध करण्यात आला. निवेदन स्वीकारण्यासाठी आयुक्तांनीच यावे, असा आग्रह आंदोलकांनी धरला.
‘सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळत असताना तुम्ही करताय काय?’ तसेच ‘माणसे मेल्यावरच जागे होणार काय?’ अशा संतप्त भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. यावेळी आंदोलनस्थळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर येऊन त्यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी आंदोलकांनी निवेदनासह फुले व मैलामिश्रित पाण्याचा कलश देऊन महापालिका प्रशासनाचे उपहासात्मक अभिनंदन केले.
संजय पवार म्हणाले, जयंती नाला येथून सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी १४ सप्टेंबरला तुटली. त्याला शंभर दिवस झाले असून, दररोज मैलामिश्रित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. अद्याप ही वाहिनी दुरुस्त न केल्याबद्दल कर्तव्यदक्ष आयुक्त व जल अभियंता यांना मैलामिश्रित पाणी व फुले भेट देऊन अभिनंदन करण्यात आले.
वास्तविक मैलायुक्त पाणी नदीत मिसळत असल्याने काविळीची साथ पसरू शकते. दोन वर्षांपूर्वी इचलकरंजीत काविळीमुळे ३८ लोक मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत.
प्रशासनाने ८ जानेवारीपर्यंत ही वाहिनी दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे. या वेळेत हे काम पूर्ण झाले नाही तर १० जानेवारीनंतर आयुक्त व जलअभियंत्यांच्या कार्यालयात घुसून त्यांना मैलामिश्रित पाण्याने अंघोळ घालू.
आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, रवी चौगुले, शशी बिडकर, दत्ताजी टिपुगडे, अवधूत साळोखे, हर्षल सुर्वे, कमलाकर जगदाळे, रणजित आयरेकर, शुभांगी पोवार, सुजाता सोहनी, आदी सहभागी झाले होते.
‘प्रदूषण नियंत्रण’चे अधिकारी धारेवर
दरम्यान, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांना निवेदन दिले. यानंतर देवणे यांनी क्षेत्रीय अधिकारी सुशील शिंदे यांना सोबत घेऊन जयंती नाला येथे येऊन त्यांना वस्तुस्थिती दाखविली.
यावेळी जिल्हाप्रमुख पवार यांनी ‘तुम्ही वरिष्ठांना अहवाल पाठविला का? तुम्ही जर कर्तव्यात कसूर करीत असाल तर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना येथे बोलावून वस्तुस्थिती दाखवू,’ असा इशारा दिला.