कोल्हापूर आणि डॉ. बाबासाहेब
By Admin | Published: April 13, 2016 10:02 PM2016-04-13T22:02:24+5:302016-04-13T23:38:03+5:30
छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांची पहिली भेट
कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेल्या अस्पृश्यांच्या चळवळीत सुशिक्षित अस्पृश्य तरुण होते. दत्तोबा संतराम पोवार हे त्या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावायचे. छत्रपती शाहू महाराजांचे ते अतिशय निष्ठावंत सहकारी होते. दत्तोबा पोवार यांचा १९१७ साली आंबेडकर यांच्याशी परिचय झाला. डॉ. आंबेडकरांच्या शिक्षणामुळे पोवार भारावून गेले. त्यांनी ही माहिती शाहू महाराजांना दिली. अस्पृश्य समाजातील तरुणाने इतके शिक्षण घेतले आहे, हे ऐकून शाहू महाराजांना अपार आनंद झाला अन् लगेचच त्यांनी डॉ. बाबासाहेबांशी ओळख करून द्यावी, अशी इच्छा व्यक्त केली. १९१९ मध्ये डॉ. आंबेडकरांना भेटण्यासाठी शाहू महाराज मुंबईला गेले. आंबेडकर परळमधील चाळीत राहात होते. कोल्हापूरचे राजे आपल्याला भेटण्यासाठी आले आहेत, असा निरोप मिळताच दुसऱ्या मजल्यावरून ते खाली आले आणि महाराजांना भेटले. महाराजांनी बाबासाहेबांना ते उतरलेल्या पन्हाळा लॉजवर नेले. या ठिकाणी दोघांमध्ये झालेल्या चर्चेत महाराजांनी आंबेडकरांना कोल्हापूर भेटीचे निमंत्रण दिले. बाबासाहेबांनी हे निमंत्रण स्वीकारले.
दलित प्रजा परिषद
खासबाग मैदानावर ३० डिसेंबर १९३९ रोजी दलित प्रजा परिषद घेण्यात आली होती. तिच्या अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर होते. या दिवशी रिसाल्याजवळ त्यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर तिथून डॉ. आंबेडकर यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर अधिवेशनास प्रारंभ झाला. दलित प्रजा परिषदेत झालेले ठराव छत्रपती राजाराम महाराजांना देण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी त्यांची भेट घेतली. परिषदेतील ठराव त्यांच्यासमोर मांडले. यावेळी राजाराम महाराजांनी त्यांना या ठरावांच्या कामी योग्य ते लक्ष देण्याचे आश्वासन दिले. डॉ. आंबेडकर यांना राजवाड्यावर भोजनाची अनेक निमंत्रणे राजाराम महाराजांनी दिली होती. इतका या दोघांतील स्नेहभाव घट्ट होता.
खासबाग मैदान येथील प्रजा परिषदेनिमित्त कोल्हापुरात आल्यानंतर दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यास डॉ़ आंबेडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला़ याप्रसंगी बी़ एच़ वराळे, गंगाराम कांबळे, मसू लिगाडे, थळू बेळे-सातार्डेकर, शांताराम सरनाईक, केरू बनगे, आबा सरनाईक, खोडा गंगाराम, संभाजी भातवे, रामचंद्र अंबपकर, दादासाहेब शिर्के, यशवंत सुळगावकर, आदी.
डॉ. आंबेडकरांची कोल्हापूरची शेवटची भेट
राजाराम महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात भाषण देण्याच्या निमित्ताने डॉ. आंबेडकर २४ आणि २५ डिसेंबर १९५२ रोजी कोल्हापुरात आले. कोल्हापूरकरांसाठी ही त्यांची भेट शेवटची ठरली; कारण त्यानंतर ते कोल्हापुरात येऊ शकले नाहीत.