कोल्हापूर : अंगणवाडी सेविका, मदतनिसांची भाऊबीज तालुक्याला वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:25 AM2018-10-26T11:25:48+5:302018-10-26T11:27:23+5:30
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी जाहीर करण्यात आलेली २ हजार रुपयांची भाऊबीज रक्कम जिल्हा पातळीवरून तालुका कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे.
कोल्हापूर : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी जाहीर करण्यात आलेली २ हजार रुपयांची भाऊबीज रक्कम जिल्हा पातळीवरून तालुका कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे.
१ कोटी ५३ लाख रुपयांची ही रक्कम दिवाळीपर्यंत या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. महिला आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यात ७६१९ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. त्यांना प्रत्येकी २ हजार रुपये भाऊबीज महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घोषित केली होती. त्यानुसार १ कोटी ५३ लाखांची ही रक्कम जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाली असून, ती तालुका पातळीवर वर्ग करण्यात आली आहे.
प्रत्येक अंगणवाडीतील किरकोळ खर्चासाठी दरवर्षी १ हजार रुपये परिवर्तनीय निधी दिला जात होता. तो आता दुप्पट म्हणजे २000 रुपये करण्यात आला आहे, अशी एकूण ७७ लाख रुपयांची रक्कमही तालुक्याला वर्ग करण्यात आली आहे.
सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी प्रतिवर्षी २ साड्यांसाठी प्रत्येकी ४00 रुपये गणवेश निधी दिला जात होता. तोदेखील ८00 रुपये करण्यात आला असून, ती रक्कमदेखील तालुक्याला वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात आले.