अभिमानास्पद! कोल्हापूरचा अनिकेत जाधव भारतीय फुटबाॅल संघात, चमकदार कामगिरीची दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 11:11 AM2022-03-05T11:11:21+5:302022-03-05T11:34:46+5:30
कोल्हापूरच्या फुटबाॅल इतिहासात भारतीय वरिष्ठ संघात निवड होणारा तो पहिला फुटबाॅलपटू ठरला.
कोल्हापूर : पुढील वर्षी होणाऱ्या एएफसी आशियाई चषक पात्रता फेरीचे सामन्यांच्या तयारीसाठी भारतीय फुटबाॅल संघ बहरिन व बेलारूस येथे दोन मैत्रीपूर्ण सामने खेळणार आहे. याकरिता भारतीय फुटबाॅल महासंघाने शुक्रवारी संभाव्य ३८ जणांच्या भारतीय संघाची निवड जाहीर केली. त्यात कोल्हापूरच्या अनिकेत जाधव याचाही समावेश आहे. कोल्हापूरच्या फुटबाॅल इतिहासात भारतीय वरिष्ठ संघात निवड होणारा तो पहिला फुटबाॅलपटू ठरला.
अनिकेतने २०१७ साली भारतात झालेल्या १७ वर्षाखालील युवा विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत प्रथमच भारतीय संघात स्थान पटकाविले होते. त्यातही तो निवड झालेला पहिला कोल्हापूकर फुटबाॅलपटू ठरला होता. सध्या तो गोव्यात सुरू असलेल्या आयएसएल लीग स्पर्धेत हैदराबाद एफसी संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. या स्पर्धेतही त्याने आपल्या संघाकडून चमकदार कामगिरी करीत संघाला तिसऱ्या स्थानावर आणले आहे.
त्याच्या मिडफिल्डर म्हणून चमकदार कामगिरीची दखल भारतीय फुटबाॅल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमक यांनी घेतली. त्यांनी अनिकेतची भारतीय फुटबाॅल महासंघाच्या ३८ जणांच्या संभाव्य ब्ल्यू टायगर अर्थात भारतीय वरिष्ठ गट फुटबाॅल संघात मिडफिल्डर म्हणून समावेश केला.
कोल्हापूरला अभिमान..
अनिकेतने २०१७ साली भारतात झालेल्या १७ वर्षाखालील युवा विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर त्याने इंडियन ॲरोज, जमशेदपुर एफसी, पुन्हा इंडियन ॲरोज आणि आता हैदराबाद एफसी संघाकडून व्यावसायिक फुटबाॅलपटू म्हणून चमकदार कामगिरी केली. ब्लॅकबर्न रोव्हर्स या जगातील नामांकित फुटबाॅल क्लबमधून व्यावसायिक फुटबाॅलचे प्रशिक्षण घेतले आहे. या दरम्यान अनेक दिग्गज संघासोबत सामनेही खेळले आहेत. त्याच्यावर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील तमाम फुटबाॅलप्रेमीतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
बहरीन व बैलारूस येथे होणाऱ्या सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करेन. जेणेकरून पुढील वर्षी होणाऱ्या आशिया पात्रता फेरीच्या सामन्यांची चांगली तयारी हाेईल. - अनिकेत जाधव, आंतरराष्ट्रीय फुटबाॅलपटू