कोल्हापूरच्या तिघा खेळाडूंची राज्य क्रिकेट संघात वर्णी
By सचिन भोसले | Published: January 6, 2024 05:44 PM2024-01-06T17:44:04+5:302024-01-06T17:47:15+5:30
कोल्हापूर : तेवीस वर्षाखालील सी.के.नायडू चषक क्रिकेट स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या अनिकेत नलवडे, श्रेयस चव्हाण, अभिषेक निषाद या तिघांची महाराष्ट्र राज्य ...
कोल्हापूर : तेवीस वर्षाखालील सी.के.नायडू चषक क्रिकेट स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या अनिकेत नलवडे, श्रेयस चव्हाण, अभिषेक निषाद या तिघांची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली. तिघेही कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू आहेत.
ही स्पर्धा ७ जानेवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान वेगवेगळ्या राज्यात खेळविली जाणार आहे. यात महाराष्ट्रासह सौराष्ट्र, पंजाब, झारखंड, आसाम, ओडीसा, छत्तीसगड, त्रिपुरा या आठ संघाचा समावेश आहे. महाराष्ट्राची पहिली लढत पंजाबशी आज, रविवारपासून मोहालीत होणार आहे. तर दुसरा सामना १४ जानेवारीला राजकोट येथे सौराष्ट्रशी, तर तिसरा समाना २१ जानेवारीपासून आसाम बरोबर गहूंजे (पुणे) येथे होणार आहे. चौथा सामना धनबाद येथे झारखंडसोबत होणार आहे. पाचवा सामना ओडीसासोबत छत्रपती संभाजीनगर येथे आणि सहवा सामना त्रिपूराबरोबर छत्रपती संभाजीनगर, सातवा सामना छत्तीसगड सोबत १८ फेब्रुवारीस छत्तासीगड येथे होणार आहे. या सामन्यांमध्ये हे तिघेही राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
अनिकेतने यापुर्वी २०१४ पासून वेगवेगळ्या गटातून राज्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने कूचबिहार, पश्चिम विभाग२५वर्षाखालील सी.के.नायडू स्पर्धेत राज्याचा उपकर्णधार म्हणूनही चांगली कामगिरी केली आहे. तर अभिषेकने २०१७-१८ मध्ये चौदावर्षाखालील महाराष्ट्र संघात, त्यानंतर २०२० मध्ये कुचबिहार मध्ये चांगली कामगिरी केले. याच जोरावर त्याची राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमी (राष्ट्रीय शिबीर) साठी निवड झाली. तो निवड झालेला पहिलाच कोल्हापूरकर होता. एकोणीस वर्षाखालील विनू मंकड स्पर्धेसाठीही त्याची निवड झाली होती.
श्रेयस चव्हाण याने २०१९ मध्ये १६ वर्षाखालील महाराष्ट्र संघातून राज्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. याच वर्षी विनू मंकड स्पर्धेसाठी निवड झाली होती. २०२२-२३ मध्ये २३ वर्षाखालील एकदिवसीय राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची राज्य संघात निवड झाली होती. या निवडी गंहूजे येथे झालेल्या १५ दिवसीय शिबीरातून करण्यात आली.