कोल्हापूर : स्थानकातच घसरले रेल्वे इंजिन, ‘हरिप्रिया एक्सप्रेस’ला जोडले दुसरे इंजिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 06:24 PM2018-07-24T18:24:34+5:302018-07-24T18:29:24+5:30
‘तिरूपती-कोल्हापूर’ मार्गावर धावणाऱ्या हरिप्रिया एक्सप्रेसचे इंजिन मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (रेल्वेस्थानक) येथे रुळांवरून घसरले. त्यानंतर दुसरे इंजिन जोडून ही एक्सप्रेस तिरूपतीच्या दिशेने रवाना करण्यात आली. अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर रेल्वे इंजिन पूर्ववत रुळांवर आणण्यात यश आले.
कोल्हापूर : ‘तिरूपती-कोल्हापूर’ मार्गावर धावणाऱ्या हरिप्रिया एक्सप्रेसचे इंजिन मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (रेल्वेस्थानक) येथे रुळांवरून घसरले. त्यानंतर दुसरे इंजिन जोडून ही एक्सप्रेस तिरूपतीच्या दिशेने रवाना करण्यात आली. अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर रेल्वे इंजिन पूर्ववत रुळांवर आणण्यात यश आले.
कोल्हापुरात मंगळवारी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (रेल्वेस्थानक) येथे हरिप्रिया एक्स्प्रेसच्या इंजिनचे उजवे चाक ट्रॅकवरून घसरले. (छाया : दीपक जाधव)
या रेल्वे इंजिनने सोमवारी (दि. २३) हरिप्रिया एक्सप्रेस कोल्हापूरमध्ये आणली. मंगळवारी सकाळी दहा वाजता हरिप्रिया एक्सप्रेस घेऊन जाण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक एकजवळील ट्रॅकवरून निघताना या रेल्वे इंजिनच्या उजव्या बाजूचे चाक रुळांवरून घसरले. त्यावर चालकाने इंजिन तेथेच थांबविले आणि त्याची माहिती स्टेशन प्रबंधकांना कळविली. त्यांनी याची माहिती मिरज जंक्शनला दिली. त्यानंतर तेथून अॅक्सिडेंट रिलीफ ट्रेनद्वारे अभियंता, कर्मचारी असे ५० हून अधिकजण या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी सुमारे दीड तास प्रयत्न करून हे इंजिन पूर्ववत ट्रॅकवर आणले.
कोल्हापुरात मंगळवारी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (रेल्वेस्थानक) येथे हरिप्रिया एक्स्प्रेसच्या इंजिनचे उजवे चाक ट्रॅकवरून घसरले. (छाया : दीपक जाधव)
इंजिन ट्रॅकवर येताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. रेल्वेचे अतिरिक्त मेकॅनिकल इंजिनिअर एल. व्ही. जाधव, वाहतूक अधिकारी विवेक कुमार, स्टेशन प्रबंधक आॅस्टिन फर्नांडिस, आदींच्या मार्गदर्शनाखाली इंजिन ट्रॅकवर आणण्याची कामगिरी पार पडली.