कोल्हापूर : साखर आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करा, स्वाभिमानी संघटनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 01:40 PM2018-12-03T13:40:46+5:302018-12-03T13:43:40+5:30
राज्याच्या साखर आयुक्तपदी वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करावी अशी मागणी ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रल्हाद इंगोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे मुख्य सचिव डी के जैन यांच्याकडे निवेदनादवारे केली.
कोल्हापूर : राज्यातील साखर कारखानदारावर प्रशासनाचा अजिबात वचक राहिलेला नाही. ऊस दर नियंत्रण मंडळाने घेतलेल्या शेतकरी हिताच्या कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाने केली नाही त्यामुळे राज्याच्या साखर आयुक्तपदी वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करावी अशी मागणी ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रल्हाद इंगोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे मुख्य सचिव डी के जैन यांच्याकडे निवेदनादवारे केली.
साखर आयुक्त संभाजी कडू पाटील हे नुकतेच निवृत्त झाले आहेत राज्याच्या सहकार क्षेत्रात कणा असलेला साखर उद्योग काही वषार्पासून डबघाईला आल्याचे अवास्तव चित्र सर्वत्र निर्माण करून अनेक प्रस्थापित मंडळी शेतकऱ्यांना कमी दर देत आहेत .
या उद्योगाला शासनाने वेळोवेळा मोठमोठे पॅकेज देवून सहकार्य केले आहे. मात्र त्याचा योग्य वापर झाला नाही. शेतकऱ्यांना कधी योग्य दर कारखान्यांनी दिला नाही. साखर आयुक्तांच्या आदेशाला, शासनाच्या आदेशाला प्रस्थापित कारखाने जुमानत नाहीत.
सहकार क्षेत्रावर प्रशासनाचा वचक राहिलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होवून सहकार क्षेत्र मोडकळीस आले आहे. म्हणून या क्षेत्रात सुधारणा होवून शेतकऱ्यांना ऊसाचा दर मिळण्यासाठी व सहकार क्षेत्र टिकण्यासाठी साखर आयुक्त या महत्वाच्या पदावर तुकाराम मुंडे यांच्या सारख्या सक्षम, निर्भीड, अधिकाऱ्यांची नियक्ती करावी. जेणे करून या विभागाला शिस्त लागेल, भ्रष्टाचार कमी होईल व कारखानदारावर प्रशासनाची पकड निर्माण होवून सहकार क्षेत्र अबाधित राहील.