कोल्हापूर परिसरात साकारला ‘सॉकर स्ट्रीट’; मॅरेडोना, मेस्सी, झिदान, बॅक हमच्या चित्रांनी रंगल्या भिंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 02:54 PM2020-02-14T14:54:41+5:302020-02-14T14:56:22+5:30
खंडोबा तालीम मंडळ व फुटबॉल अकॅडमीतर्फे शिवाजी पेठेतील तालमीच्या परिसरात बुवा चौक ते जुना वाशी नाका या मार्गावरील घरांच्या भिंतींवर ‘सॉकर स्ट्रीट’ साकारण्यात आले. जागतिक फुटबॉलपटलावरील दिग्गज फुटबॉलपटू अर्जेंटिनाच्या दियागो मॅरेडोनासह लिओनील मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, झिनेदिन झिदान, नेमार ज्युनिअर अशा एक ना अनेक दिग्गजांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. त्याचे अनावरण छत्रपती शाहू व पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते झाले.
कोल्हापूर : खंडोबा तालीम मंडळ व फुटबॉल अकॅडमीतर्फे शिवाजी पेठेतील तालमीच्या परिसरात बुवा चौक ते जुना वाशी नाका या मार्गावरील घरांच्या भिंतींवर ‘सॉकर स्ट्रीट’ साकारण्यात आले. जागतिक फुटबॉलपटलावरील दिग्गज फुटबॉलपटू अर्जेंटिनाच्या दियागो मॅरेडोनासह लिओनील मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, झिनेदिन झिदान, नेमार ज्युनिअर अशा एक ना अनेक दिग्गजांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. त्याचे अनावरण छत्रपती शाहू व पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते झाले.
परिसरातील आबालवृद्धांनाही फुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ‘खंडोबा’ने फुटबॉल संघाचे व्यवस्थापक सतीश सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून ‘सॉकर स्ट्रीट’ साकारला आहे. यामुळे परिसरात फुटबॉलमय वातावरण निर्माण झाले आहे.
शाहू छत्रपती म्हणाले, खेळाबरोबर कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कार करून पोलीस दलाबरोबरचे ऋणानुबंध कसे आहेत, याची अनुभूती दिली. सॉकर स्ट्रीटच्या संकल्पनेमुळे फुटबॉलच्या प्रसाराबरोबर खेळ भावना वाढून व्यसनमुक्तीही होईल.
पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, खेळाचा प्रसार आणि दिग्गज खेळाडूंकडे पाहून त्यांच्या उंचीपर्यंत पोहोचण्याची ताकद या चित्रातून मिळेल. आजही ऐतिहासिक नगरीतील शतकोत्तर तालीम असलेल्या ‘खंडोबा’कडून व शाहू छत्रपती यांच्या हस्ते झालेला सत्कार म्हणजे खुद्द महाराजांच्या हस्ते मावळ्यांचा सत्कार झाल्याची माझी भावना आहे.
तालमीतर्फे किणी टोलनाक्यावरील चकमकीत सहभागी झालेल्या पोलीस अधिकारी तानाजी सावंत यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, ज्येष्ठ फुटबॉल मार्गदर्शक अप्पासाहेब वणिरे, अरुण नरके, बांधकाम व्यावसायिक अजयसिंह देसाई, चंद्रकांत सूर्यवंशी, तालमीचे अध्यक्ष प्रल्हाद पवार, सतीश सूर्यवंशी, राजेंद्र चव्हाण, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. अभिजित वणिरे यांनी केले.
किट घालण्याचा मोह
खंडोबा तालीम मंडळाने यंदा अ, ब, क आणि १३ व १५ वर्षांखालील अशा सात संघांकरिता तयार केलेल्या निळ्या रंगाच्या किटचे अनावरण झाले. यावेळी खुद्द शाहू छत्रपतींनाही किट घालण्याचा मोह आवरला नाही. यामुळे उपस्थितांचा आनंद आणखी द्विगुणित झाला.