कोल्हापूर : आंबेडकर, मेवाणी, खलीद, कोळसे-पाटील यांना अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 03:46 PM2018-03-28T15:46:21+5:302018-03-28T15:46:21+5:30
शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या सन्मानार्थ बुधवारी हिंदुत्त्ववादी संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला. यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवाणी, उमर खलिद, माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांवर भीमा-कोरेगांव दंगल घडविल्याप्रकरणी अटक करण्याची मागणी करण्यात आली.
कोल्हापूर : शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या सन्मानार्थ बुधवारी हिंदुत्त्ववादी संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला. यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवाणी, उमर खलिद, माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांवर भीमा-कोरेगांव दंगल घडविल्याप्रकरणी अटक करण्याची मागणी करण्यात आली.
मोर्चाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन व ध्येय मंत्राने साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बिंदु चौक येथून झाली. मोर्चाच्या अग्रभागी भगवे झेंडे, भगव्या टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा बिंदु चौक -आईसाहेब महाराज पुतळा- लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर- व्हीनस कॉर्नर - स्टेशनरोड- असेंब्ली रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता प्रेरणा मंत्राने झाली.
निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांना दिलेल्या निवेदनात अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘नक्षलवादी हे देशाचे मित्र आहेत’असे विधान केले आहे. त्यामुळे त्यांनी संविधानाच्या ‘ नागरीक मुलभूत कर्तव्याचा ’ अनादर केला आहे. याशिवाय सीआरपीएफ जवानांचाही घोर अपमान केला आहे. यासह प्रक्षोभ वक्तव्य करणाऱ्या उमर खलीद यांना एल्गार परिषदेत आणून वातावरणात आणखी तेढ निर्माण केला.
संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर भीमा-कोरेगाव दंगलीत दगड फेकीचा खोटा आरोप करणाऱ्या महिलेला अटक करुन त्यांची नार्को टेस्ट घ्यावी. ३ जानेवारी २०१८ च्या दंगलीवेळी राहूल फटांगळे या युवकाची हत्या झाली. त्याच्या हत्येप्रकरणी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह सहकाऱ्यांना दोषी ठरवून हत्येचा गुन्हा नोंद करावा.
भीमा-कोरेगाव दंगलीप्रकरणी अॅड. प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवाणी, उमर खलीद, माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांना अटक करावी. या मागणीसाठी बुधवारी कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात ‘भारतीय संविधान’ ची प्रत घेवून सहभागी झालेले बंडा साळुंखे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (सर्व छाया : आदित्य वेल्हाळ)
जिग्नेश मेवाणी, उमर खलीद, बी.जी.कोळसे पाटील,आदींच्यावर महाराष्ट्र बंद च्या दरम्यान झालेल्या अर्थिक, सार्वजनिक, खासगी मालमत्तेच्या नुकसानीला जबाबदार धरुन नुकसान भरपाई वसुल करावी व गुन्हे दाखल करावेत. कोल्हापूरसह इतर ठिकाणी पोलीस-पत्रकारांवर हल्ले करणाऱ्या समाजकंटकानाही अटक करावी. या सर्व मागण्यांचा विचार करुन कारवाई न झाल्यास कोल्हापूर जिल्हा बंद पुकारण्यात येईल. असेही म्हटले आहे.
यावेळी विविध हिंदुत्त्ववादी संघटनांच्यावतीने बंडा साळुंखे, महेश उरसाल, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, माजी जिल्हा प्रमुख रवि चौगुले, मुरलीधर जाधव, शहराध्यक्ष दुर्ग्रेश लिंग्रज, किशोर घाटगे, तानाजी आंग्रे, विठ्ठल पाटील, सुनील सामंत, मनोहर सोरप, मधुकर नाझरे, श्रीकांत पोतनीस, अॅड. रणजित घाटगे, राजू यादव, जयराज हारुगले, दीपक गौड, रमेश खाडे, सुमित सुर्यवंशी, अॅड. केदार मुनीश्वर, कुलदीप गायकवाड, जयदीप शेळके, शिवानंद स्वामी, नगरसेवक राहूल चव्हाण, मेघना पेडणेकर, दिपाली शिंदे, नम्रता पाटील, सुवर्णा पवार, ऐश्वर्या मूनीश्वर, आदी उपस्थित होते.
हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते बंडा साळुंखे हे मोर्चात ‘भारतीय संविधान ’ची प्रत घेवून सहभागी झाले होते. तर कार्यकर्त्यांच्या हातामध्ये ‘धर्माच राजकारण करण्यापेक्षा समाज हिताच राजकारण करा’, ‘शाहू नगरीत संविधानाचा मान राखू, जातीपाती मुक्त करु ’, ‘ नक्षलवादी देशभक्त, तर पोलीस कोण ’ आदी घोषणा फलकांसह भिडे गुरुजींचे छायाचित्र असलेले फलक लक्ष वेधून घेत होते.
सकाळी दहा वाजल्यापासून कार्यकर्ते बिंदुचौकात जमण्यास सुरुवात झाली. तत्पुर्वी सकाळी नऊ वाजल्यापासून अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या नेतृत्वाखाली दिडशेहून अधिक पोलीस फौजफाटा या परिसरात तैनात करण्यात आला होता. त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरुप आले होते.