कोल्हापूर : शिक्षण समिती सभापतिपदी अशोक जाधव यांची निवड, उपसभापतिपदी सचिन पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 05:46 PM2018-07-03T17:46:42+5:302018-07-03T17:49:26+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापतिपदी अशोक जाधव (कॉँग्रेस) व उपसभापतिपदी सचिन पाटील (राष्ट्रवादी) यांची बहुमताने निवड झाली. मंगळवारी महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित शिक्षण समितीच्या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार होते.
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापतिपदी अशोक जाधव (कॉँग्रेस) व उपसभापतिपदी सचिन पाटील (राष्ट्रवादी) यांची बहुमताने निवड झाली. मंगळवारी महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित शिक्षण समितीच्या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार होते.
शिक्षण समिती सभापतिपदासाठी नगरसेवक अशोक जाधव (कॉँग्रेस) व नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील (भाजप) यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी सभाध्यक्षांनी दोन्ही अर्जांची छाननी केली. त्यानंतर माघारीसाठी १५ मिनिटांची वेळ देण्यात आली. यामध्ये कोणीही अर्ज मागे घेतला नाही; त्यामुळे हात वर करून मतदान घेण्यात आले.
यामध्ये अशोक जाधव यांना पाच, तर विजयसिंह खाडे-पाटील यांना चार मते पडली. उपसभापतिपदासाठी नगरसेवक सचिन पाटील (राष्ट्रवादी) व नगरसेविका मेहजबीन सुभेदार (ताराराणी आघाडी) यांचे अर्ज दाखल झाले होते. यावेळी मतदान घेण्यात आले असता पाटील यांना पाच, तर सुभेदार यांना चार मते पडली.
शिक्षण समितीचे नूतन सभापती जाधव हे प्रभाग क्रमांक ५ - लक्ष्मीविलास पॅलेस मतदारसंघातून संपूर्ण शहरात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. जाधव स्वत: माध्यमिक शिक्षक आहेत.
नूतन उपसभापती सचिन पाटील हे प्रभाग क्रमांक ३४ - शिवाजी उद्यमनगर मतदारसंघातून नगरसेवक म्हणून महापालिकेवर प्रथमच निवडून आले आहेत. निवडीनंतर पीठासन अधिकारी खेमनार यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी अतिरिक्तआयुक्त श्रीधर पाटणकर, सहायक आयुक्त मंगेश शिंदे, प्रशासनाधिकारी शंकर यादव, नगरसचिव दिवाकर कारंडे, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, प्रॉ. फंड अधीक्षक उमाकांत कांबळे उपस्थित होते.