कोल्हापूर : चंदगडसाठी भाजपकडून अशोक चराटींचे नाव पुढे, उद्या पालकमंत्र्यांचा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 11:37 AM2018-08-23T11:37:58+5:302018-08-23T11:40:26+5:30

चंदगड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेद्वार म्हणून आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी यांचे नाव पुढे आले आहे.

 Kolhapur: Asoka Charatin's name from BJP ahead of Chandgad; | कोल्हापूर : चंदगडसाठी भाजपकडून अशोक चराटींचे नाव पुढे, उद्या पालकमंत्र्यांचा दौरा

कोल्हापूर : चंदगडसाठी भाजपकडून अशोक चराटींचे नाव पुढे, उद्या पालकमंत्र्यांचा दौरा

Next
ठळक मुद्देचंदगडसाठी भाजपकडून अशोक चराटींचे नाव पुढेउद्या पालकमंत्र्यांचा दौरा, आढावा घेण्याची शक्यता

कोल्हापूर : चंदगड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेद्वार म्हणून आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी यांचे नाव पुढे आले आहे.

मतदारसंघातील लिंगायत मते, आधीच्या संस्थात्मक व अन्य राजकारणामध्ये चराटी, देशपांडे गटाने इतरांना केलेले सहकार्य आणि नव्याने या मतदारसंघात झालेल्या भाजपच्या जुळणीचा आढावा घेतल्यानंतर चराटी यांचे नाव चर्चेत आले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी आजरा, गडहिंग्लज दौऱ्यावर आहेत. यावेळी या मतदारसंघाचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर संध्यादेवी कुपेकर यांनी दोनवेळा या मतदारसंघातून बाजी मारली आहे. आगामी निवडणुकीमध्ये त्यांच्याऐवजी कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर रिंगणात येण्याची दाट शक्यता आहे. चंदगडमधून नरसिंगराव पाटील यांचे चिरंजीव राजेश पाटील, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील आणि गोपाळराव पाटील हे याहीवेळी स्पर्धेत असतील.

एक-दीड वर्षांपूर्वीपर्यंत नंदिनी बाभूळकर यांनीच भाजपमध्ये यावे, यासाठी प्रयत्न झाले; परंतु त्यांनी राष्ट्रवादीमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. राजेश पाटील यांची उमेद्वारी संजय मंडलिक यांच्या भूमिकेवर ठरू शकते; त्यामुळे संजय मंडलिकांचा लोकसभेचा निकाल काय लागतो, यालाही त्यांच्यादृष्टीने महत्त्व आहे.

भाजपमध्ये जेव्हा चंदगडच्या उमेद्वारीची चर्चा झाली, तेव्हा आता जुने चेहरे चालणार नाही, यावर भर देण्यात आला आहे. चंदगडची जनता गेली अनेक वर्षे तीन पाटील उमेद्वारांना मदत करत आली; मात्र यामध्ये कुपेकर बाजी मारत आले आहेत.

म्हणूनच यावेळी नवा चेहरा देण्याची इच्छा असलेल्या भाजप नेत्यांसमोर अशोक चराटी हे एकमेव नाव आले आहे. आजरा येथील अण्णा भाऊ संस्था समूहाच्या माध्यमातून १२00 हून अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार देणाºया समूहाचे नेते म्हणून अशोक चराटी कार्यरत आहेत.

सध्या ते आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष, जिल्हा बँक संचालक, बाजार समिती संचालक अशा विविध पदांवर कार्यरत आहेत. भरमूअण्णा पाटील यांचा आजरा तालुक्यातील किणे कोळिंद्रे जिल्हा परिषद मतदारसंघातील गट अशोक चराटी यांनीच सांभाळला होता; त्यामुळे आजरा तालुक्यातील चंदगडमध्ये समाविष्ट असणाऱ्या ३0/३२ गावांमध्ये चराटी यांचा प्रभावी संपर्क आहे.

सत्तेचा वापर करण्याची खुबी, नेटके नियोजन या बळावर काशिनाथ चराटी आणि माधवराव देशपांडे यांच्यानंतर चराटी यांनी आजरा तालुक्यामध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. म्हणूनच भाजपकडून त्यांच्या नावाचा गांभीर्याने विचार सुरू आहे; मात्र यासाठी भाजपमधीलच रमेश रेडेकर यांच्या महत्त्वाकांक्षेला लगाम घालावा लागणार आहे.

चंदगडमधील पाटील ठरणार महत्त्वाचे

कुपेकरांनी चंदगड तालुक्यात गावोगावी आपला गट तयार केला आहे. गोपाळराव पाटील सध्या भाजपमध्ये आहेत. लोकसभेनंतरच्या परिस्थितीमध्ये राजेश पाटील किंवा भरमूअण्णा पाटील यांचे भाजपला सहकार्य मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न होणार आहेत.

चांगले पद देण्याची तयारी दर्शवून त्यांनी चराटी यांच्यामागे ताकद लावावी, असे हे सूत्र असेल. गडहिंग्लज तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर लिंगायत मतेही चराटी यांना मिळू शकतात. या मतदारसंघातील भाजपचे सदस्य तर मदत करतीलच याशिवाय अधिकाधिक निधी देत अन्य पक्षांच्या सदस्यांनीही भाजपला मदत करावी, असे प्रयत्न सुरू आहेत.

 

Web Title:  Kolhapur: Asoka Charatin's name from BJP ahead of Chandgad;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.