तीन वर्षांत कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी : पालकमंत्री सतेज पाटील; ‘लोकमत युथ एक्सलन्स अवॉर्ड’चे वितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 12:21 PM2022-02-16T12:21:37+5:302022-02-16T12:22:40+5:30
‘लोकमत युथ एक्सलन्स अवॉर्ड’च्या माध्यमातून तरुणाईला ‘लोकमत’ने व्यासपीठ मिळवून दिले
कोल्हापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सहापदरी, तर कोल्हापूर-कोकणकडे जाणारे तीन राष्ट्रीय महामार्ग होणार आहेत. जूनमध्ये विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. यासह अन्य पायाभूत सुविधांमुळे पुढील तीन वर्षांत कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी येणार आहे.
सन २०२६ हे कोल्हापूरचे वर्ष असणार आहे. त्यामुळे आपल्या शहराचे मार्केटिंग, ब्रँडिंग आपणच केले पाहिजे. याच भूमिकेतून आपण सर्वजण कार्यरत राहूया, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे केले.
‘लोकमत युथ एक्सलन्स अवॉर्ड’च्या वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. या अवॉर्डच्या माध्यमातून तरुणाईला ‘लोकमत’ने व्यासपीठ मिळवून दिले आहे. यापुढे भरारी घेण्याची जबाबदारी तुमची आहे. ती तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल, असा विश्वासही पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास रूरल रिलेशन्सचे संस्थापक प्रदीप लोखंडे उपस्थित होते.
मावळतीची सूर्यकिरणे, रॉक बँडचा सूर, कर्तृत्ववान तरुणाईच्या उपस्थितीमध्ये ‘लोकमत युथ एक्सलन्स अवॉर्ड कॉफीटेबल बुक’चे शानदार समारंभात प्रकाशन झाले. ‘ब्रँड कोल्हापूर’च्या माध्यमातून आम्ही कोल्हापुरातील अनेकांचा सन्मान दरवर्षी करतो.
आपण विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळविला आहात. कष्ट करण्याची तयारी, जिद्द असेल, तर निश्चित यश मिळते. हे युथ एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित प्रत्येकाने दाखवून दिले आहे. आई-वडील, कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकारी यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आज तुम्ही कोल्हापूरचे युथ आयकॉन म्हणून ओळखले जात असून, त्याचा मला अभिमान असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यंकटेश्वरा गारमेंटचे यशराज माने, प्रणव माने, सिद्धांत हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. कौस्तुभ वाईकर, श्री सिद्धी होम अप्लायन्सेसचे व्यवस्थापक प्रशांत कांबळे उपस्थित होते.
‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी प्रास्ताविक केले. गुणवंतांच्या जोरावरच समाज मार्गक्रमण करीत असतो. अशा गुणवंतांचा शोध घेऊन त्यांचे कौतुक करण्याची ‘लोकमत’ची परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले. सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख यांनी आभार मानले.
यावेळी वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) विवेक चौगुले, श्रीराम जोशी, व्यवस्थापक (मनुष्यबळ व प्रशासन) संतोष साखरे, ‘लोकमत कनेक्ट’चे उपव्यवस्थापक दीपक मनाठकर उपस्थित होते. ऐश्वर्या पवार यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी व्यंकटेश्वरा गारमेंट, सिद्धांत हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, श्री सिद्धी होम अप्लायन्सेस यांचे सहकार्य लाभले.
यांचा झाला सन्मान
डॉ. सुशील अग्रवाल, डॉ. विकास बामणे, अमरसिंह भोसले, राजदीप भोसले, डॉ. सुमित्रा भोसले, डॉ. पूजा चोपडे-पाटील, महादेव चौगले, रितेश दलाल, मिलिंद धोंड, अभिषेक गांधी, प्रकाश घुंगूरकर, शैलेश जाधव, चिन्मय कडेकर, विनायक कारंडे, डॉ. प्रवीण कोडोलीकर,
स्मिता लंगडे, अमृत महाडिक, करण माळी, प्रवीण माळी, गणेश माने, हर्षा माने, सचिन मांगले, अन्नू मोतीवाला, राहुल मूग, ॲड. अब्दुल मुल्ला, चेतन ओसवाल, भावेश पटेल, दत्तात्रय पाटील, गौरव पाटील, डॉ. निहारिका प्रभू, विश्वजित सावंत, रौनक शहा, करण सोनवणे, रोहन तोडकर, महेश उत्तुरे, निशांत वाकडे, रोहित झेंडे.
क्षमता ओळखून आपले ‘रोल मॉडेल’ निवडा
- आपल्यामध्ये भरलेली नकारात्मकता प्रचंड नुकसान करत आहे. त्यामुळे ती काढून टाकून आपण जे काम करत आहोत, ते अधिक प्रभावीपणे करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन ‘रूरल रिलेशन्स’चे संस्थापक प्रदीप लोखंडे यांनी केले.
- आपापल्या उद्योग, व्यवसायात उत्तम काम करणाऱ्या ‘युथ आयकॉन्स’शी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल लोखंडे यांनी यावेळी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले.
- ते म्हणाले, शिक्षणामुळे जग बदलत असले तरी नकारात्मक भावना मोठे नुकसान करत आहे. तुम्ही उद्योजक, व्यावसायिक अनेक कुटुंबांचे पोशिंदे आहात याची जाणीव ठेवा.
- आपला देश बदलतोय. पण ऊठसूट आपली आणि अमेरिकेची तुलना करू नका. आपल्या कामाची दिशा कशी असली पाहिजे हे सांगताना लोखंडे म्हणाले, तुम्ही आपण कोणाला तरी उत्तरदायी आहोत, जबाबदार आहोत याचे भान असू द्या. कामात सातत्य, आपल्या वस्तू, सेवांना मिळणारा प्रतिसाद याला महत्त्व देत नावीन्याचा शोध घेत राहण्याची गरज आहे.
- आपल्या क्षमता ओळखून आपले ‘रोल मॉडेल’ निवडा असेही त्यांनी आवर्जून सांगितले. आपल्या प्रेरणादायी वक्तृत्वाने त्यांनी वेगळी छाप पाडली.