कोल्हापूर : वर्षभरात २९० अल्पवयीन मुलींवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:07 PM2018-05-09T12:07:39+5:302018-05-09T12:07:39+5:30
अल्पवयीन मुलींना खाऊचे आमिष आणि प्रेमाच्या जाळ्यात पाडून, लग्नाचे आमिष दाखवून गेल्या वर्षभरात कोल्हापूर परिक्षेत्रात २९० बलात्काराचे गुन्हे घडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी पोलिस कोणते पाऊल उचलणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकनाथ पाटील
कोल्हापूर : अल्पवयीन मुलींना खाऊचे आमिष आणि प्रेमाच्या जाळ्यात पाडून, लग्नाचे आमिष दाखवून गेल्या वर्षभरात कोल्हापूर परिक्षेत्रात २९० बलात्काराचे गुन्हे घडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी पोलिस कोणते पाऊल उचलणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जम्मू-काश्मीर येथील कथुआ येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेने देश हादरून गेला म्हणून बारा वर्षांच्या आतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस मृत्युदंड देण्याचा वटहुकूम राष्ट्रपतींनी जारी केला आहे.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात वर्षभरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या किती घटना घडल्या याची माहिती ‘लोकमत’ ने जाणून घेतली असता धक्कादायक आकडेवारी पुढे आली.
वीटभट्टी, ऊसतोड मजूर, सेंट्रिंग व्यवसाय, झोपडपट्टीसह मध्यम व उच्च राहणीमान असलेल्या वस्तीमध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढू लागल्या आहेत. जवळच्या आणि विश्वासातीलच व्यक्तींकडूनच अशा घटना घडत आहेत.
परिक्षेत्रात कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या वर्षभराच्या कालावधीत कोवळ्या तीन ते चौदा वर्षांपर्यंतच्या २९० बालिकांवरही खाऊचे आमिष दाखवून अतिप्रसंग करण्याच्या आणि बलात्काराच्या घडना घडल्या आहेत. ही गुन्हेगारांची विकृती रोखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.
युवती-महिलांवरील अत्याचार
युवती-महिलांना लग्नाचे, नोकरीचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून शेवटी लग्नास किंवा नोकरी लावण्यास नकार दिल्याप्रकरणीही परिक्षेत्रात ६०० बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत; तर विनयभंगाचे १८२९ गुन्हे दाखल आहेत.
जिल्हानिहाय चित्र (अल्पवयीन मुलींवरील अत्याचार)
- कोल्हापूर : ५५
- सांगली : ३८
- सातारा : ४८
- सोलापूर ग्रामीण : ६०
- पुणे ग्रामीण : ८९
अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्याने पोलीस तपास व्यवस्थित करीत नाहीत. कायद्यातील बदलांची माहिती पोलिसांना नसते; त्यामुळे आरोपी निर्दोष सुटत असल्याने त्यांचे मनोधैर्य वाढत आहे. हे रोखण्यासाठी कायद्यातील बदलांची माहिती देण्यासाठी पोलिसांची कार्यशाळा घेणे गरजेचे आहे. आरोपी कोण, हे पाहण्यापेक्षा अत्याचारी मुलींना न्याय मिळवून देण्याची मानसिकता ठेवली तर अशा घटनांना चाप बसेल.
- अॅड. शिवाजीराव राणे,
ज्येष्ठ विधिज्ञ, कोल्हापूर