कोल्हापूर : राजारामपुरीतील एटीएम सेंटर भरदिवसा फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 11:43 AM2018-08-23T11:43:29+5:302018-08-23T11:45:22+5:30
राजारामपुरी पोलीस ठाण्यापासून काही फुटांच्या अंतरावर असणारे बँक आॅफ इंडियाचे ए.टी.एम. सेंटर फोडण्याचा एका परप्रांतीयाचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.
कोल्हापूर : राजारामपुरी पोलीस ठाण्यापासून काही फुटांच्या अंतरावर असणारे बँक आॅफ इंडियाचे ए.टी.एम. सेंटर फोडण्याचा एका परप्रांतीयाचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.
याप्रकरणी हरमेलसिंग संतोखसिंग धालीवाल (वय ३०, रा. पंजाब) या चोरट्याला रंगेहात पकडण्यात आले. याच पोलीस ठाण्यातील महिला पोलिसासह तिघा पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे हा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडील लोखंडी गज जप्त करण्यात आला.
राजारामपुरी पोलीस ठाण्यात अर्चना जाधव या महिला पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. बुधवारी सायंकाळी त्या पोलीस ठाण्याजवळ असणाऱ्या बँक आॅफ इंडियाच्या ए.टी.एम. सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या. त्यावेळी या सेंटरमध्ये एक चोरटा लोखंडी रॉडने ए.टी.एम. मशीन फोडण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी पोलीस जाधव यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी त्वरित ही घटना मोबाईलवरून पोलीस ठाण्यात कळविली.
पोलीस नाईक प्रकाश पारधी आणि भूषण ठाणेकर यांनी तत्काळ त्या ए.टी.एम. सेंटरकडे धाव घेतली. तसेच त्यांनी तातडीने त्या चोरट्याला रंगेहात पकडले. त्याच्याकडून लोखंडी गज तसेच विविध बँकांची एटीएम कार्ड, पॅनकार्ड, आधार कार्ड असे साहित्य जप्त करण्यात आले आले.
आणखी गुन्हे उघडकीस येणार
अटक केलेल्या हरमेलसिंग धालीवाल याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याबाबत शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर व पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी त्याच्याकडे चौकशी केली.