कोल्हापूर : कर्नाटकचा अर्ज रद्द करून घेण्यासाठी प्रयत्न, सीमाप्रश्नी तज्ज्ञ समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 02:07 PM2018-07-27T14:07:48+5:302018-07-27T14:12:29+5:30
सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारने २०१४ मध्ये दिलेला अर्ज रद्द करून साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्याचे काम सुरू व्हावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रयत्न करण्याचा निर्णय मुंबईत मंत्रालयात झालेल्या सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते व या समितीचे अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील होते. नवीन मुख्य सचिव दिनेशकुमार जैन प्रमुख उपस्थित होते.
कोल्हापूर : सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारने २०१४ मध्ये दिलेला अर्ज रद्द करून साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्याचे काम सुरू व्हावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रयत्न करण्याचा निर्णय मुंबईत मंत्रालयात झालेल्या सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते व या समितीचे अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील होते. नवीन मुख्य सचिव दिनेशकुमार जैन प्रमुख उपस्थित होते.
हा प्रश्न लवकर धसाला लागावा यासाठी मुख्यमंत्री व वरिष्ठ मंत्री लवकरच दिल्लीतील या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नियुक्त केलेल्या हरीश साळवे यांच्यासह वरिष्ठ विधिज्ञांची लवकरच भेट घेतील, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.
सकाळी साडेदहा वाजता मुख्य सचिवांच्या दालनात सुमारे दीड तास ही बैठक झाली. या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील दाव्यात तत्कालीन सरन्यायाधीश जे. पी. लोढा यांनी १२ सप्टेंबर २०१४ मध्ये साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून घेण्याचे आदेश दिले होते. त्याचवेळी कर्नाटक सरकारने हा दावाच काढून टाकण्यात यावा, असा अर्ज (क्रमांक १२ ए) दिला. त्यामुळे मूळ दाव्याची सुनावणी बाजूला राहून या अर्जावरच सुनावणी सुरू आहे.
हा अर्ज निकाली काढण्यासाठी न्यायालयात बाजू मांडणे आवश्यक आहे. त्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे व इतरांची राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व या प्रश्नी समन्वयाची जबाबदारी असलेल्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेणे आवश्यक आहे. ही भेट लवकरात लवकर होईल, असे मुख्य सचिवांनी स्पष्ट केले.
या प्रश्नात विविध क्षेत्रांतील आठजणांच्या साक्षी होणार आहेत. त्यामध्ये माजी मुख्य सचिव अजित निंबाळकर, निवृत्त अप्पर सहकार निबंधक दिनेश ओऊळकर, पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटचे अर्थतज्ज्ञ डॉ. राजेश परचुरे, डेक्कन कॉलेजच्या डीन व भाषातज्ज्ञ डॉ. सोनल कुलकर्णी, संस्कृतीचे अभ्यासक डॉ. मुराटकर, राज्य पुर्नरचनेचे अभ्यासक डॉ. प्रकाश पवार व डॉ. भारती पवार आणि लोकेच्छासंबंधी मालोजीराव अष्टेकर हे साक्ष देणार आहेत. त्यामुळे त्यांच्या साक्षी प्रतिज्ञापत्रावर तयार करून ठेवण्याच्या सूचना अॅडव्होकेट आॅन रेकॉर्ड शिवाजीराव जाधव यांना करण्यात आल्या.
बैठकीस अप्पर मुख्य सचिव बिपीन मलिक, मध्यवर्ती संयुक्त समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार अरविंद पाटील, श्री. अष्टेकर, श्री. ओऊळकर, प्रकाश मरगाळे, अॅड. राजाभाऊ पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.