कोल्हापूर : बाबूभाई परीख पूल वाहतुकीसाठी पूर्ववत, ४० वर्षे जुनी ड्रेनेज लाईन बदलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 05:31 PM2018-05-18T17:31:02+5:302018-05-18T17:31:02+5:30
बाबूभाई परीख पुलाच्या खालील ४० वर्षी जुनी ड्रेनेज पाईपलाईन बदलण्यासाठी या मार्गावरील वाहतूक गेल्या आठ दिवसांपासून बंद ठेवण्यात आली होती. शुक्रवारी काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली.
कोल्हापूर : बाबूभाई परीख पुलाच्या खालील ४० वर्षी जुनी ड्रेनेज पाईपलाईन बदलण्यासाठी या मार्गावरील वाहतूक गेल्या आठ दिवसांपासून बंद ठेवण्यात आली होती. शुक्रवारी काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली.
गेल्या आठ दिवसांपासून शहरातील राजारामपुरी, शाहूपुरी, साईक्स एक्स्टेंशनकडून मध्यवर्ती बसस्थानक, न्यू शाहूपुरी, ताराबाई पार्क, स्टेशन रोडला जोडणारा रेल्वेचा बाबूभाई परीख पूल महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद केल्यानंतर नागरिकांना एकतर उड्डाणपूल किंवा शाहूपुरी गोकुळ हॉटेल परिसरातून फिरून जावे लागते.
हा पल्ला किमान एक किलोमीटर एवढा आहे. त्यामुळे जवळचा मार्ग म्हणून या बाबूभाई परीख पुलाखालून जाणे नागरिकांना सोयीचे होते. या पुलाखालून चाळीस वर्षांपूर्वी ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यात आली होती. ती कालमर्यादेमुळे खराब झाली होती.
गेल्या काही वर्षांपासून पावसाळा असो वा उन्हाळा बाराही महिने या परिसरात मैलामिश्रित पाणी साचून दुर्गंधी ही पाचविलाच पूजलेली होती. एक तर काम करायचे म्हटले तर नागरिकांची गैरसोय होणार म्हणून महापालिका आरोग्य विभाग केवळ तात्पुरती मलमपट्टी करत होता. त्यातून या परिसरात पुन्हा-पुन्हा मैलामिश्रित पाणी रस्त्यावर येत होते.
ही बाब नगरसेवक संजय मोहिते यांनी गांभीर्याने घेऊन आठ दिवसांपूर्वी ड्रेनेज पाईपलाईनच बदलण्याचे काम हाती घेतले. त्यानुसार १.७५ हजार रुपयांचे तातडीचे काम आयुक्तांकडून मंजूर करून घेतले. त्यानुसार कामासही सुरुवात केली. दोन चेंबरचे काम पूर्ण करत नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. त्यात १५ दिवसांचे काम ८ दिवसांत पूर्ण केले. शुक्रवारी हे काम पूर्ण झाले आणि वाहतुकीसाठी हा पूल पूर्ववत सुरू झाला.
बाबूभाई परिख पुलाजवळील चौकात मैलामिश्रित पाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरत होती. त्यामुळे ये-जा करणारे नागरिक त्रासले होते. ही बाब ओळखून चाळीस वर्षांपूर्वीची ड्रेनेज पाईपलाईन बदलून टाकण्यात आली. त्यामुळे हा परिसर मैलामुक्त करून शहरवासीयांना दिलासा दिला.
- संजय मोहिते,
नगरसेवक