कोल्हापूर : ‘आंतरभारती’ चे अध्यक्ष बाबुराव मुळीक यांचे निधन ; शोकसभा बुधवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 04:02 PM2018-02-05T16:02:22+5:302018-02-05T16:10:57+5:30
आंतरभारती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, राष्ट्रसेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबुराव मुळीक तथा बाबा (वय ९२) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. पंचगंगा स्मशानभूमी येथे सकाळी आठ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा रवी, मुली डॉ. रुपा आणि रागिणी, स्नुषा डॉ. वर्षा, जावई डॉ. प्रविणचंद्र हेंद्रे, नातू सागर असा परिवार आहे.
कोल्हापूर : आंतरभारती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, राष्ट्रसेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबुराव मुळीक तथा बाबा (वय ९२) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. पंचगंगा स्मशानभूमी येथे सकाळी आठ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा रवी, मुली डॉ. रुपा आणि रागिणी, स्नुषा डॉ. वर्षा, जावई डॉ. प्रविणचंद्र हेंद्रे, नातू सागर असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (दि. ७) सकाळी नऊ वाजता होणार आहे.
आंतरभारती शिक्षण संस्था, समाजवादी अध्यापक सभा आणि कोल्हापूर उद्योगविश्वात मुळीक यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. समाजवादी विचारधारेप्रमाणे जीवन पद्धती, धर्मनिरपेक्षता, मानवतावादी ध्येयधोरणे त्यांनी आयुष्यभर जपली. त्यांच्या निधनाने समाजवादी विचारांचा प्रामाणिक कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त झाली. शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याने उपचारासाठी मुळीक यांना दि. ३१ जानेवारी सकाळी सहा वाजता शास्त्रीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते.
उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे दोन वाजता त्यांची प्राणज्योत मालविली. मुळीक यांचे मूळ गाव पाडळी (ता. हातकणंगले). सध्या ते जुना बुधवारपेठेतील निकम गल्लीमध्ये राहत होते. त्यांचे प्राथमिक ते मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कोल्हापुरात झाले. बडोदा (गुजरात) येथील प्रतापसिंह कॉलेज आॅफ कॉमर्स अॅन्ड इकॉनॉमिक्स येथून सन १९५० मध्ये त्यांनी बी. कॉम. ची पदवी घेतली.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मे १९४३ मध्ये ते सांगलीमधील राष्ट्र सेवा दलाच्या शिबीरामध्ये सहभागी झाले. पदवीनंतर चंपा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. यावर्षी ते कोल्हापूर इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीमध्ये इंटरनल आॅडिटरपदी रुजू झाले. सन १९६० पर्यंत त्यांनी येथे डेप्युटी मॅनेजरपदापर्यंत काम केले. यानंतर त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवकपदी, आंतरभारती शिक्षण मंडळाच्या संचालकपदी काम केले.
सन १९६६ मध्ये त्यांनी इंजिनिअरींग वर्कशॉपच्या माध्यमातून कोल्हापूरच्या उद्योगक्षेत्रात प्रवेश केला. उद्योगासह सहकार, शिक्षण, समाजपरिवर्तन क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. सोमवारी त्यांंच्या निधनाचे वृत्त समजताच अंत्यदर्शनासाठी जुना बुधवारपेठ येथील त्यांच्या निवासस्थानी आंतरभारती शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष पल्लवी कोरगांवकर, उपाध्यक्ष जिनरत्न शेटे, बी. बी. मगदूम, वंदना काशिद यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली.
पंचगंगा स्मशानभूमी येथे मुळीक यांचे पार्थिव आणण्यात आले. येथे झालेल्या शोकसभेत हसन देसाई, एम. एस. पाटोळे, हिम्मतराव साळुंखे, मिरासाहेब मगदूम, भरत लाटकर, भरत रसाळे, विश्वास काटकर, बाबासाहेब पवार यांनी भावना व्यक्त केल्या. यानंतर मुळीक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, बुधवारी दुपारी साडेतीन वाजता आंतरभारती शिक्षण संस्थेच्या शाहुपुरी येथील कार्यालयात शोकसभा होणार आहे.