कोल्हापूर : आदमापूर येथे बाळूमामांचा पालखी सोहळा-अश्वनृत्य, दोन लाखांहून भाविक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:47 PM2018-03-16T12:47:21+5:302018-03-16T12:47:21+5:30
आदमापूर (ता.भुदरगड)येथे दोन लाखांहून अधिक भाविकांच्या उपस्थित संत सदगुरु बाळूमामांची भंडारा यात्रा झाली. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश तसेच गोवा राज्यातील भाविकांनी हजेरी लावली. ढोल, कैताळ व बाळूमामांच्या नावानं चांगभलं च्या गजरात मामांच्या पालखीवर भाविकांनी १७ टन भंडाऱ्याची उधळण केली. नृत्य करणाऱ्या अश्वांचे(घोड्यांचे) पालखी सोहळ्यात खास आकर्षण होते.
वाघापूर : आदमापूर (ता.भुदरगड)येथे दोन लाखांहून अधिक भाविकांच्या उपस्थित संत सदगुरु बाळूमामांची भंडारा यात्रा झाली. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश तसेच गोवा राज्यातील भाविकांनी हजेरी लावली. ढोल, कैताळ व बाळूमामांच्या नावानं चांगभलं च्या गजरात मामांच्या पालखीवर भाविकांनी १७ टन भंडाऱ्याची उधळण केली. नृत्य करणाऱ्या अश्वांचे(घोड्यांचे) पालखी सोहळ्यात खास आकर्षण होते.
बुधवार( दि. ७)रोजी सुरु झालेल्या या भंडारा यात्रेमध्ये ह.भ.प.रणजित भारमल (अवचितवाडी), विनय कुलकर्णी (मुरगूड), अशोक कौलवकर (गारगोटी),रामचंद्र पाटील (आदमापूर), नानासो पाटील (आदमापूर), मृत्यूंजय स्वामी (सिद्धारुढमठ ,शेंद्री), शशिकांत कोंडेकर (यमगे) यांची प्रवचने तर ह.भ.प.बी.जी.सुतार (उंदरवाडी), मारुती देवडकर (यमगे), बाळासो पाटील (पुंगाव), विष्णू खोराटे (सरवडे), अर्जुन जाधव (तवंदी शिप्पूर), बाळकृष्ण परीट (हनिमनाळ) यांची कीर्तने झाली.
गावातील ४० हून अधिक भजनी मंडळांनी हरिजागर केला. मंगळवार (दि.१३) रोजी जागरादिवशी पहाटे ३ वाजता वाघापूर येथील भाकणूककार कृष्णात डोणे यांनी राजकीय, सामाजिक व अर्थविषयक भविष्यवाणी कथन केली. कृष्णात डोणे यांच्या या भाकणुकीला सत्याप्पा डोणे, पप्पू डोणे, येसबा डोणे यांनी साथ दिली.
भाकणुकीस देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले,कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम , सेक्रेटरी रावसाहेब कोणकेरी यांच्यासह भाविक उपस्थित होते. सकाळी बाळूमामा देवालयातर्फे महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
गुरुवार (दि.१५) सकाळी ७ वाजता ढोल कैताळाच्या गजरात व भंडाऱ्याच्या उधळणीत बाळूमामांच्या नामाचा जयघोष करत पालखी सोहळा मरगुबाई मंदिराकडे गेला. यावेळी धनगरी बांधव ढोलवादन करत होते तर बाळूमामांची मानाची घोडी नृत्य करत या पालखी सोहळ्यातून पुढे पुढे सरकत होती. या भव्यदिव्य पालखी सोहळ्यातील नृत्य करणाऱ्या घोड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
यावेळी मरगुबाई मंदिराच्या प्रांगणात बाळूमामा विकास फौंडेशनच्या वतीने युवा नेते रणजित पाटील , धीरज डोंगळे या मान्यवरांच्या हस्ते भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले. तसेच लायन हार्ट, स्वराज्य ग्रुप यांचेवतीनेही महाप्रसादाचे वाटप केले. मरगुबाई मंदिरातून पालखी विविध गल्ल्यांमधून धैर्यशीलराजे भोसले यांच्या वाड्यात आणलेनंतर तेथून मंदिरात नेऊन यात्रेची सांगता झाली.
यावेळी बाळूमामा देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, इतर समिती सदस्य, सेक्रेटरी रावसाहेब कोणकेरी, मॅनेजर शंकर कुदळे, आदमापूरच्या सरपंच नेहा पाटील , बाजार समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील , विजयराव गुरव, संभाजीराव भोसले, किरण कुरडे, युवराज खतकर, निवास पाटील , रामचंद्र द. .पाटील, नामदेव पाटील, हेमंत पाटील , युवराज खतकर आदी उपस्थित होते.