कोल्हापूर : बालिका मृत्यू प्रकरण : किरवेच्या पोलीसपाटीलला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 11:42 AM2018-11-09T11:42:53+5:302018-11-09T11:45:11+5:30
कोल्हापूर : दिवाळीनिमित्त रस्त्यावर आईसोबत आकाशकंदील, विद्युत माळा विक्रीसाठी बसलेल्या आठ वर्षांच्या बालिकेला बोलेरोखाली चिरडून पळून गेलेल्या किरवेच्या पोलीसपाटील ...
कोल्हापूर : दिवाळीनिमित्त रस्त्यावर आईसोबत आकाशकंदील, विद्युत माळा विक्रीसाठी बसलेल्या आठ वर्षांच्या बालिकेला बोलेरोखाली चिरडून पळून गेलेल्या किरवेच्या पोलीसपाटील याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित प्रशांत भाऊ पाटील (वय ३२, रा. किरवे, ता. गगनबावडा) असे त्याचे नाव आहे. बोलेरोखाली सापडून सुमैया ऊर्फ खदीजा बुराण सरकवास (रा. सदर बझार, कोल्हापूर) या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
सुमैया सरकवास ही आईसोबत मंगळवारी (दि. ६)ताराबाई पार्क येथील प्रादेशिक परिवहन विभागासमोर दिवाळीनिमित्त आकाशकंदील आणि विद्युत माळा विक्री करण्यासाठी बसली असताना भरधाव बोलेरोने सुमैयाला चिरडून साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी बोलेरोचा नंबर मिळविला. चौकशी केली असता, ती गगनबावडा तालुक्यातील किरवेचे पोलीसपाटील प्रशांत पाटील यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले. तो त्याचा भाऊ व गावातील दोन व्यक्ती, असे चौघेजण दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कोल्हापुरात आले होते.
घरी जात असताना त्याचा स्टेअरिंगवरील ताबा सुटून ती बालिकेच्या अंगावर गेली. अपघातामध्ये बालिका मृत झाल्याचे समजताच प्रशांत पाटील हा कळे परिसरातील हॉटेलमध्ये लपून बसला. रात्री तो गोव्याला पळून जाण्याच्या तयारीत होता. शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी त्याच्या हॉटेलवरच मुसक्या आवळल्या.