उद्या कोल्हापूर बंद! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 11:09 AM2024-06-24T11:09:04+5:302024-06-24T11:11:10+5:30

Kolhapur bandh : बैठकीत सर्वच वक्त्यांनी कोल्हापूर बंद करूनच मुख्यमंत्री शिंदे यांचे या दोन मागण्यांकडे लक्ष वेधावे, अशी जोरदार मागणी केली.

Kolhapur bandh call on Tuesday for merger & HC bench, Chief Minister Eknath Shinde will show black flags during his visit! | उद्या कोल्हापूर बंद! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवणार!

उद्या कोल्हापूर बंद! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवणार!

कोल्हापूर : कोल्हापूर शास्वत विकास परिषदेसाठी उद्या, मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात येणार आहेत. त्यांनी आणि पूर्वीच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढ आणि सर्किट बॅचच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात येणार असलेल्या दिवशीच म्हणजे मंगळवारी कोल्हापूर बंद करण्याचा निर्णय रविवारी हद्दवाढ कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत अध्यक्षस्थानी होते. माजी महापौर आर. के. पोवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. 

बैठकीत सर्वच वक्त्यांनी कोल्हापूर बंद करूनच मुख्यमंत्री शिंदे यांचे या दोन मागण्यांकडे लक्ष वेधावे, अशी जोरदार मागणी केली. कृती समितीचे अॅड. बाबा इंदलकर म्हणाले, राजकीय अनास्थेमुळे हद्दवाढ, सर्किट बॅचची मागणी पूर्ण झालेली नाही. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यावेळी कोल्हापूर कडकडीत बंद करण्यासाठी मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता बिंदू चौकात एकत्र येऊ. तेथून शहरात मोटारसायकल रॅली काढून बंद यशस्वी करण्यासाठी आवाहन करू, याशिवाय मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांचे पोस्टर तयार करून त्याला काळे फासू, पोलिसांचे कडे तोडून मुख्यमंत्री शिंदे यांना काळे झेंडे दाखवू. 

बार असोसिएशनचे अध्यक्ष खोत म्हणाले, हद्दवाढ, सर्किट बेंचच्या मागण्या अनेक वर्षांपासूनच्या आहेत. या मागण्या पूर्ण होण्यासाठी जनरेट्याची आवश्यकता आहे. सर्किट बेंचसाठी सहा जिल्ह्यांचा पाठिंबा आहे. सन २०२५ मध्ये मुख्य न्यायमूर्तींनी कोल्हापुरातच सर्किट बेंच होण्यासंबंधीचा अहवाल दिला आहे. आता मुख्यमंत्र्यांनी मुख्य न्यायमूर्तीना भेटून ही मागणी पूर्ण करून घ्यायची आहे; पण २०१५ ते २०२४ अखेपर्यंत मुख्यमंत्री यासाठी भेटू शकलेले नाहीत. म्हणून सर्किट बेंच, हद्दवाढीसाठी जो निर्णय कृती समितीच्या बैठकीत होईल, त्याला बार असोसिएशनचा पाठिंबा राहील. 

किशोर घाटगे म्हणाले, यापूर्वीच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढ, सर्किट बॅचची मागणी पूर्ण केलेली नाही. म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनाच विरोध करणे चुकीच आहे. हद्दवाढीला विरोध करणारे शुक्राचार्य कोण आहेत ते शोधून त्यांच्या घरांवरही काळे डोंडे घेऊन गेले पाहिजे. तर अॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच हद्दवाढ करण्यासंबंधीचा निर्णय घेण्याचे आश्वासन नगरविकास मंत्री असताना दिले होते. ते आता मुख्यमंत्री आहेत, त्यांनी हद्दवाढीचा निर्णय घ्यावा. झारीतील शुक्राचार्य शोधण्याऐवजी हद्दवाढीचा निर्णय त्यांनी घ्यावा.

यावेळी बाबा पार्टे, दिलीप देसाई, अशोक भंडारे, बाबूराव कदम, चंद्रकांत यादव, सतीशचंद्र कांबळे, पद्मा तिवले, दिलीप पोवार, अनिल घाटगे, सचिन चव्हाण, अॅड. रणजित गावडे यांची भाषणे झाली. बैठकीस अॅड. प्रशांत शिंदे, निशिकांत पाटोळे, व्ही. आर. पाटील, संभाजीराव जगदाळे, आदी उपस्थित होते.

अशास्वत सरकारकडून शास्वत परिषद कसली?
अॅड. इंदूलकर म्हणाले, शिंदे यांचे सरकारच आहेत. एक फूल दोन हाफचे सरकार आहे. यांचे सरकारच अशास्वत असताना शास्वत विकास परिषद कसली घेता? विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने शास्वत विकासाचे गाजर दाखवले आहे. शासनाचा हा फुगा आहे.

ईडीग्रस्त मुख्यमंत्र्यांचे नैतिक धाडस नाही...
सर्किट बेंचची मागणी मूख्य न्यायमूर्तींना भेटून चर्चा केल्यानंतर पूर्ण होऊ शकते. पण, मुख्यमंत्री शिंदे हे ईडीग्रस्त असल्याने त्यांच्याकडे मुख्य न्यायमूर्तींना भेटण्याचे नैतिक धाडस नाही, असा गंभीर आरोपही अॅड. इंदूलकर यांनी केला.

Web Title: Kolhapur bandh call on Tuesday for merger & HC bench, Chief Minister Eknath Shinde will show black flags during his visit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.