तरुणांच्यात द्वेष कोणी पेरला?; पोलिस इतके गाफील कसे राहिले?, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेटसवरुन कोल्हापुरात दंगल
By भारत चव्हाण | Published: June 9, 2023 01:03 PM2023-06-09T13:03:59+5:302023-06-09T13:13:50+5:30
छत्रपती शाहू महाराज यांच्या शिकवणीचा प्रचंड पगडा असलेले पुरोगामी शहर आहे; परंतु या शहराची वैचारिक जडणघडण, पुरोगामी चेहरा अनेकांच्या डोळ्यात खुपत आहे.
भारत चव्हाण
कोल्हापूर : शंभर वर्षांहून अधिक काळ समता, बंधुता जोपासत धर्म आणि जाती-पातीच्या पलिकडे जाऊन ‘सख्खे शेजारी’ म्हणून राहणाऱ्या कोल्हापुरातील हिंदु-मुस्लीम समाजात उभी फूट पाडण्याचा प्रयत्न अतिशय निंदनीय आहे. बुधवारी कोल्हापूर बंदला लागलेल्या हिंसक वळणात शिरलेली अठरा- वीस वर्षांची तरुण मुलं हातात दगड, विटा घेऊन याच आपल्या शेजाऱ्यांवर हल्ला करतात, ही गाेष्टही मनाला वेदना देणारी तसेच फुूले - शाहू -आंबेडकर यांच्या विचारांना तिलांजली देणारी आहे. ज्या वयात चांगले शिक्षण घ्यायचे त्याच वयात त्यांच्या मेंदूत द्वेषभावना कोणी पेरली ? हा प्रश्न काेल्हापूरकरांना अस्वस्थ करणारा आहे.
देशातील अनेक शहरांपैकी कोल्हापूर एक असले तरी हे शहर एक विशिष्ट परंपरा, इतिहास असलेले शहर, देशाला समतेची दिशा देणारे आणि भारतीय राज्य घटनेला एक भरभक्कम पाया देणारे, छत्रपती शाहू महाराज यांच्या शिकवणीचा प्रचंड पगडा असलेले पुरोगामी शहर आहे; परंतु या शहराची वैचारिक जडणघडण, पुरोगामी चेहरा अनेकांच्या डोळ्यात खुपत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जातीय सलोखा बिघडत चालला असल्याची जाणीव काही सुज्ञ नागरिकांना होऊ लागली होती. आठ दिवसांपूर्वी कोल्हापुरातील काही पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन पोलिस खात्याला त्याबाबतची माहिती देऊन सावध करण्याचा प्रयत्न केला होता. माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनीही पत्रकारांशी बाेलताना अलिकडील काही घटना लक्षात घेता पुढील एक- दोन महिन्यांत काही तरी घडण्याची शक्यता बोलून दाखविली होती. एवढे सावध करूनही पोलिस खाते इतके निष्क्रिय का राहिले ? त्यांना या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची सद्बुद्धी का सुचली नाही, त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का ? असे अनेक प्रश्न आता समोर आले आहेत.
औरंगजेबाच्या उदात्तीकरणाची घटना मंगळवारी घडली. खरे तर ज्यांच्याकडून ही घटना घडली त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई झालीच पाहिजे. समाजात दंगे घडविण्याच्या हेतूने घडवून आणलेले हे कृत्य देशद्रोही मानले जायला पाहिजे आणि त्यानुसारच कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे यात कोणाचे दुमत नाही; परंतु एकीकडे पोलिस कारवाई करत असताना दुसरीकडे बहुजनांच्या भावना भडकविणे हेही तितकेच गंभीर आहे. पोलिसांना या घटनेमागचा मेंदू शोधून काढण्यास, तपास तसेच कारवाई करण्यास थोडा वेळ द्यायला पाहिजे होता. प्यादी सापडली, त्यामागचा ‘मास्टरमाईंड’ शोधून त्याच्यावरदेखील कारवाई झाली तर पुन्हा असे धाडस कोणी करणार नाही.
गुप्तवार्ता विभागाचे अपयश
- एका विशिष्ट संघटनेचे पदाधिकारी शहरालगतच्या गावात, तसेच जिल्ह्यात बैठक घेत आहेत, त्या बैठकीतून कोणता संदेश दिला जात आहे हे समजत नाही. उदात्तीकरणाची एखादी गंभीर घटना घडते आणि पोलिस त्याची गांभीर्याने दखल घेत नाहीत.
- आठ- पंधरा दिवसआधी सावध करूनही दोन्ही समाजातील प्रमुखांना बोलावून बैठका घेतल्या जात नाहीत. शांतता समितीच्या बैठका होत नाहीत. सौहार्दाचे वातावरण तयार केले जात नाही. ही निष्क्रियता म्हणायची नाही तर आणखी काय ?
- मंगळवारी रस्त्यावर उतरलेल्या तरुणांची संख्या पाहता दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर येतील, याचा अंदाज पोलिस खात्याला येत नाही. बंद पुकारणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर पोलिस निर्बंध लादत नाहीत. त्यामुळे पोलिसांविषयीच संशय बळावला जात आहे. कोल्हापुरातील घटना या पोलिस दलातील गुप्तवार्ता विभागाचे अपयश आहे.
बहुजनांच्या मुलांनी दगडंच फेकायची ?
व्हॉटस्ॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या युगात जन्मलेल्या बहुजन समाजातील मुलांना इतिहास माहीत नाही. त्यांना तो शिकविण्यात जुनी पिढी कमी पडली आहे. त्यामुळेच समाजविघातक शक्तींनी चुकीचा इतिहास, जातीचे विष त्यांच्या मेंदूत भरण्यास सुरुवात केली आहे. एका पिढीवर मोठा विपरित परिणाम झाला आहे, हे कोल्हापुरातील घटनांनी सिद्ध केले आहे. उच्च शिक्षण घेऊन आपलं करिअर घडवायच्या दिवसात जातीचे विष घेतलेल्या या बहुजन समाजातील मुलांनी नुसती दगडफेकच करायची का ? आपली मुलं दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाचवायची का ? याचा आता पालकांनीच गांभीर्याने विचार करायला पाहिजे.