कोल्हापूर : बापट कॅम्प, लाईन बझार पंपिंग स्टेशन डिसेंबरअखेर पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:06 PM2018-08-02T12:06:50+5:302018-08-02T12:12:19+5:30
पंचगंगा प्रदूषण रोखण्याबाबत बापट कॅम्प आणि लाईन बझार नाल्यावरील पंपिंग स्टेशन डिसेंबरअखेर पूर्ण करणार असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषण रोखण्याबाबत बापट कॅम्प आणि लाईन बझार नाल्यावरील पंपिंग स्टेशन डिसेंबरअखेर पूर्ण करणार असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची आढावा बैठक पुण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत आयुक्त डॉ. चौधरी यांनी ही माहिती दिली.
या बैठकीस कोल्हापूर, सोलापूर, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि सातारा नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नदीचे प्रदूषण रोखण्याबाबतच्या केलेल्या उपाययोजना, घनकचरा व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या आढावा बैठकीत कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पंचगंगा नदी प्रदूषण, सांडपाणी प्रक्रिया केंद्राबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी त्यांनी, बापट कॅम्प आणि लाईन बझार येथील सांडपाणी पंपिंग स्टेशनद्वारे उचलून कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर नेण्याबाबत माहिती दिली. तसेच लाईन बाजार आणि बापट कॅम्प येथील नाल्यावरील पंपिंग स्टेशन डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत पूर्ण करू, असे आश्वासन दिले.
या बैठकीत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव यांनी, पर्यावरण संवर्धनासाठी राखीव असलेला २५ टक्के निधी हा घनकचरा व्यवस्थापन, नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र, रंकाळा प्रदूषण रोखणे यावर नियमाप्रमाणे खर्च करण्याच्या सूचना दिल्या.
दुधाळी केंद्र महिन्यात पूर्ण क्षमतेने सुरू
दुधाळी येथे १७ एम. एल. डी. क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया केंद्र हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. तो महिन्यात पूर्ण क्षमतेने सुरू होईल, अशीही माहिती आयुक्त डॉ. चौधरी यांनी या बैठकीत दिली.