कोल्हापूरच्या युवा कलाकारांनी देशपातळीवर कोरलं नाव; अभिनव अन् आकाशच्या लघुपटाला पारितोषिक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 11:24 AM2022-04-02T11:24:46+5:302022-04-02T11:25:07+5:30
जागतिक तंबाखू विरोधी दिवसानिमित्त मंत्रालयाने आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी देशभरातून १८०० प्रवेशिका दाखल झाल्या होत्या.
कोल्हापूर : भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्यामार्फत देशपातळीवर घेण्यात आलेल्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर भारत सरकार यांचेतर्फे देशपातळीवर घेण्यात आलेल्या तंबाखू विरोधी स्पॉट मेकिंग लघुपट स्पर्धेत कोल्हापूरच्या अभिनव अजय कुरणे याने दोन लाखाचे पारितोषिक मिळवले. कोल्हापूरच्याच आकाश बोकमुरकर याच्याही लघुपटाला उत्तेजनार्थ दहा हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. यानिमित्ताने येथील युवा कलाकार पिढीने कोल्हापूरचे नाव देशपातळीवर अभिमानाने कोरले आहे.
जागतिक तंबाखू विरोधी दिवसानिमित्त मंत्रालयाने आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी देशभरातून १८०० प्रवेशिका दाखल झाल्या होत्या. ३१ मे ते ३० जून २०२१ या कालावधीत या प्रवेशिका मागवण्यात आल्या होत्या. तंबाखू सेवनाला विरोध यावर केंद्रित असलेल्या या स्पर्धेसाठी पाठविण्यात आलल्या कोल्हापूरच्या अभिनव कुरणे याच्या लघुपटाला या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला. त्याला दोन लाखाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. त्याच्याबरोबरच कोल्हापूरच्याच आकाश बोखमुरकर याच्या ही लघुपटाला उत्तेजनार्थ दहा हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
तंबाखू सेवनामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची जनजागृती करणे, तंबाखू सेवन करणाऱ्यांना त्यापासून परावृत्त करणे, सामाजिक बदल आणि तबाखू सेवन करणाऱ्यांची, विशेषत: युवकांची संख्या कमी करणे, तंबाखू विरोधी जनजागरण मोहिमेला उत्तेजन देणे, लघुपटाच्या माध्यमातून तंबाखू नियंत्रण धोरणांची परिणामकारक जनजागृती आणि मोहिमेला सहकार्य करणे या मुद्यांवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
अभिनव कुरणे हा कोल्हापूरचे प्रसिध्द मालिका दिग्दर्शक अजय कुरणे यांचा मुलगा आहे. सध्या सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत तो भूमिका करत आहे. त्याचे आणि आकाशचे काैतुक होत आहे.