फुटबॉलवेडा प्रशिक्षक; 'श्वास' पणाला लावून संतोष देतोय धडे, झोपताना रोज घ्यावा लागतो कृत्रिम श्वासोश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 11:48 AM2022-06-20T11:48:05+5:302022-06-20T12:02:35+5:30
फुटबॉल हा त्याचा ‘श्वास’ असला तरी रात्री झोपताना मात्र त्यालाच कृत्रिम ‘श्वास’ घ्यावा लागत आहे.
सचिन भोसले
कोल्हापूर : शालेय, महाविद्यालयीन, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय अशा अनेक फुटबॉल स्पर्धा त्याने गाजविल्या. फुटबाॅल त्याचा जणू ‘श्वास’ बनून गेला. वयोपरत्वे फुटबॉल खेळणं बंद झाले, पण खेळाची नाळ काही तुटलेली नाही. आजही तो प्रशिक्षक म्हणून फुटबाॅल उत्कर्षासाठी प्रयत्नशील आहे. फुटबॉल हा त्याचा ‘श्वास’ असला तरी रात्री झोपताना मात्र त्यालाच कृत्रिम ‘श्वास’ घ्यावा लागत आहे.
या फुटबाॅलवेड्या प्रशिक्षकाचे नाव आहे..संतोष ऊर्फ पापा पोवार ! यंदाच्या फुटबाॅल हंगामात शिवाजी तरुण मंडळाने पाचपैकी चार स्पर्धांचे विजेतेपद पटकावून वर्चस्व गाजविले. या यशात प्रशिक्षक संतोष पोवार याचे मोलाचे योगदान आहे. संतोषचे हे यश दिसत असले तरी त्यांला रोजच्या जीवनात जगण्यासाठी अक्षरश: श्वास पणाला लावावा लागत आहे. त्यांच्या जगण्याविषयी थोडंस...
संतोष यांनी शालेय जीवनात महाराष्ट्र हायस्कूलकडून, तर महाविद्यालयीन जीवनात शिवाजी विद्यापीठाकडून राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर प्रॅक्टिस फुटबाॅल क्लब(ब), पाटाकडील तालीम मंडळ(अ), जयशिवराय तरुण मंडळ फुटबाॅल क्लब आणि शिवाजी तरुण मंडळाकडून अनेक फुटबाॅल हंगामही गाजविले. अकरा वर्षांपूर्वी महापालिकेच्या घरफाळा विभागात नोकरी लागली. सध्या मीटर रिडर म्हणून ते कार्यरत आहेत. गेले अनेक वर्षे महाराष्ट्र हायस्कूलमध्ये लहानग्यांना प्रशिक्षण देत आहेत. हीच बाब जाणून शिवाजी तरुण मंडळाचे व्यवस्थापनाने त्यांच्यावर प्रशिक्षणाची जबाबदारी टाकली.
झोपताना कृत्रिम श्वासोश्वास न घेतल्यास धोका
यादरम्यान त्यांना रात्री झोपल्यानंतर श्वसननलिका दबली जात होती. त्यामुळे श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांनी अनेक तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घेतला. तर त्यांना रोज रात्री झोपताना कृत्रिम श्वासोश्वास न घेतल्यास धोका निर्माण होईल, असा सल्ला देण्यात आला. त्याचा राेजचा खर्च परवडेना म्हणून त्यांनी हे मशीनच खरेदी केले. त्यानंतर खऱ्या जगण्याला सुरुवात झाली.
गेली तीन वर्षाचा दिनक्रम
पहाटे पाच वाजता उठल्यानंतर थेट महाराष्ट्र हायस्कूल मैदान गाठायचे. तेथे मुलांचा सराव घेऊन पुढे गांधी मैदानात शिवाजी तरुण मंडळच्या खेळाडूंचा सराव घ्यायचा. सकाळी ९ नंतर घरी परतल्यानंतर चहा, नाष्टा करून पुन्हा कामावर जाण्यासाठी सज्ज व्हायचे. दिवसभर महापालिकेत नोकरी करून पुन्हा रात्री घरी परतायचे. रात्री झोपताना हे मशीन लावूनच झोपायचे, असा गेली तीन वर्षे त्यांचा दिनक्रम सुरू आहे.
तीन वर्षे झोपल्यानंतर रात्री श्वसननलिका आकुंचन पावते. त्यामुळे श्वासोश्वास घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. मी कृत्रिम श्वासोश्वास मशीनचा आधार घेत आहे. या कालावधीत माझे फुटबाॅलवरील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. उलट जगण्यासाठी हा खेळच आधार बनला आहे. -संतोष पोवार, फुटबाॅल प्रशिक्षक