कोल्हापूर बाजार समिती निवडणूक: महाविकास आघाडीसमोर कोरे, महाडिक, मंडलिकांचे आव्हान
By राजाराम लोंढे | Published: March 23, 2023 02:24 PM2023-03-23T14:24:30+5:302023-03-23T14:25:17+5:30
राज्यातील सत्तांतरानंतर व लोकसभेपूर्वी बाजार समितीच्या निमित्ताने आघाडी व भाजप-शिवसेना नेत्यांचा कस लागणार
कोल्हापूर : बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसला रोखण्यासाठी गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेले आमदार विनय काेरेंना आपल्याकडे घेऊन आव्हान निर्माण करण्याची खेळी भाजप-शिवसेनेची आहे. गेल्यावेेळेला विरोधात असलेले आमदार पी. एन. पाटील यांना आपल्यासोबत घेऊन आघाडी भक्कम करण्याची रणनीती आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांची राहणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर व लोकसभेपूर्वी बाजार समितीच्या निमित्ताने आघाडी व भाजप-शिवसेना नेत्यांचा कस लागणार हे निश्चित आहे.
करवीर, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा व निम्मा कागल असे साडे सहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र कोल्हापूर बाजार समितीचे आहे. समितीवर २००२ पूर्वी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची एकहाती सत्ता होती. मात्र २००२ नंतर राष्ट्रवादी व जनसुराज्य पक्षाने सत्ता ताब्यात घेतली, मात्र संचालकांच्या बंडखोरीने पुन्हा महाडिक यांच्या ताब्यातच सत्ता गेली. २००७ पासून २०२० पर्यंत राष्ट्रवादी व जनसुराज्य पक्षाची एकहाती सत्ता राहिली आहे.
समितीच्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादी, जनसुराज्य, आमदार सतेज पाटील गट, शेकाप, समरजित घाटगे गट यांच्या आघाडीला १९ पैकी १५ जागा मिळाल्या होत्या. माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या गटाला दोन, भाजपला एक तर एक अपक्षाने बाजी मारली होती. आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने झुंज दिली होती.
गेल्या पाच-सहा वर्षात जिल्ह्याच्या राजकारणात फेरबदल झाले असून, राज्यातील सत्तांतराचे पडसाद या निवडणुकीत उमटणार आहेत. जिल्हा बँक, ‘गोकुळ’ व बाजार समिती ही तीन दोन्ही काँग्रेसची सत्ता केंद्रे आहेत, येथील सत्ताच लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या अडचणीच्या ठरू शकतात. यासाठी बाजार समितीत दोन्ही काँग्रेसला रोखण्यासाठी भाजप-शिवसेना निकराचे प्रयत्न करणार हे निश्चित आहे.
‘ए.वाय.’ यांच्या भूमिकेकडे लक्ष
राधानगरी तालुक्यातील विकास संस्था व ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची पकड आहे. मात्र ते गेली दोन वर्षे पक्षात अस्वस्थ आहेत. खासदार मंडलिक यांच्याशी वाढलेली सलगी भविष्यातील राजकारणावर परिणाम करू शकते. त्यामुळे ‘ए.वाय.’ यांना सोबत घेण्याचा भाजप, शिवसेनेेचा प्रयत्न आहे. तसे झाले तर महाविकास आघाडीसमोरील अडचणी वाढणार हे निश्चित आहे.
तरच लोकसभेला योग्य संदेश जाईल
लोकसभेची निवडणूक वर्षभरावर आल्याने त्याची बांधणी आताच करावी लागणार आहे. बाजार समिती निवडणुकीला एकसंधपणे सामोरे गेलो तरच लोकसभेसाठी योग्य संदेश जाऊ शकतो, तसा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे.
मागील सभागृहात असे होते बलाबल :
राष्ट्रवादी - ६
जनसुराज्य - ५
सतेज पाटील - २
चंद्रदीप नरके - २
भाजप -१
समरजित घाटगे - १
शेकाप - १
अपक्ष - १
असे राहणार गट -
गट जागा
विकास संस्था ११ (सर्वसाधारण : ७, इतर मागासवर्गीय -१, भटक्या विमुक्त जाती-१, महिला -२)
ग्रामपंचायत ०४ (सर्वसाधारण :२, आर्थिक दुर्बल : १, अनुसूचित जाती -१)
अडते, व्यापारी ०२
हमाल तोलाईदार ०१
संभाव्य पॅनल असे -
महाविकास आघाडी : हसन मुश्रीफ, सतेज पाटील, पी. एन. पाटील, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, सत्यजित पाटील-सरुडकर, मानसिंगराव गायकवाड, संजय घाटगे, संपतराव पवार.
भाजप-शिवसेना आघाडी : चंद्रकांत पाटील, विनय काेरे, संजय मंडलिक, धनंजय महाडिक, प्रकाश आबीटकर, चंद्रदीप नरके, समरजित घाटगे, बजरंग देसाई, पी. जी. शिंदे.