कोल्हापूर बाजार समिती निवडणूक: सर्वपक्षीय मोट बांधण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात, 'असे' होणार जागावाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 06:08 PM2023-04-19T18:08:54+5:302023-04-19T18:09:26+5:30
भाजपमधून कोणाला संधी मिळणार?
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वपक्षीय मोट बांधण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला सहा, काँग्रेस व जनसुराज्य पक्षाला प्रत्येकी तीन जागा देण्याचा निर्णय झाला आहे. उर्वरित सहा पैकी शिवसेना (ठाकरे गट) एक, शिवसेना (शिंदे गट) व भाजपला प्रत्येकी दोन जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
‘शेकाप’ला एक जागा मिळण्याची शक्यता असून आज पॅनलची घोषणा केली जाणार आहे.
राज्य व केंद्रात भाजप-शिवसेनेचे सरकार असल्याने बाजार समितीची निवडणूक सर्वांना सोबत घेऊन करण्याची भूमिका पहिल्यापासूनच दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची आहे. आमदार विनय काेरे यांच्या माध्यमातून भाजपसोबत चर्चा सुरु आहे. याबाबत मंगळवारी रात्री उशिरापर्यंत जागा व उमेदवार निश्चितीचे काम सुरु होते.
मुश्रीफ, कोरे, चंद्रकांत पाटील यांच्यात मुंबईत बैठक
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हसन मुश्रीफ व आमदार विनय काेरे यांच्यात मुंबईत बैठक झाली असून यामध्ये जागा वाटपावर तोडगा निघाल्याचे समजते.
असे होणार जागा वाटप :
राष्ट्रवादी काँग्रेस : ६
काँग्रेस : ३
जनसुराज्य : ३
भाजप : २
शिवसेना (शिंदे गट) : २
शिवसेना (ठाकरे गट) : १
शेकाप : १
कोणाला कोणत्या गटातील जागा मिळू शकतात :
विकास संस्था (एकूण जागा ११) : पी. एन. पाटील, हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, मानसिंगराव गायकवाड, विनय कोरे, संजय घाटगे, शिवसेना (शिंदे गट, संजय मंडलिक, प्रकाश आबीटकर, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर यांच्यापैकी एक जागा), भाजप
ग्रामपंचायत (एकूण जागा ४) : सतेज पाटील, पी. एन. पाटील, विनय कोरे, संपतराव पवार
अडते-व्यापारी (एकूण जागा २) : भाजप व शिवसेना (शिंदे गट)
हमाल तोलाईदार : विनय कोरे
भाजपमधून संधी कोणाला मिळणार?
भाजपला तीन जागा दिल्या असल्या तरी खासदार धनंजय महाडीक, समरजीत घाटगे व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांना संधी मिळू शकते. मात्र इच्छुकांची संख्या पाहिली तर संधी कोणाला द्यायची असा पेच निर्माण होऊ शकतो.