कोल्हापूर : डेंग्यूबाबत दक्ष रहा : बोंद्रे, पाच महिन्यांत ५२ डेंग्यूसदृश रुग्ण, घरांचे सर्व्हेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 11:55 AM2018-05-30T11:55:31+5:302018-05-30T11:55:31+5:30

कोल्हापूर शहरात गेल्या पाच महिन्यांत ५२ डेंग्यूसदृश रुग्ण आढळले असून त्याची गांभीर्याने दखल घेऊन संपूर्ण शहरभर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून सर्वच घरांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे, अशी माहिती महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी महापौर शोभा बोंद्रे यांनी डेंग्यूच्या साथीबाबत बोलविलेल्या बैठकीत दिली.

Kolhapur: Be cautious about dengue: 52% dengue patients, house survey started in five months | कोल्हापूर : डेंग्यूबाबत दक्ष रहा : बोंद्रे, पाच महिन्यांत ५२ डेंग्यूसदृश रुग्ण, घरांचे सर्व्हेक्षण सुरू

कोल्हापूर : डेंग्यूबाबत दक्ष रहा : बोंद्रे, पाच महिन्यांत ५२ डेंग्यूसदृश रुग्ण, घरांचे सर्व्हेक्षण सुरू

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या बैठकीत डेंग्यूबाबत दक्ष रहाण्याच्या बोंद्रे यांनी दिल्या सूचनापाच महिन्यांत ५२ डेंग्यूसदृश रुग्ण, घरांचे सर्व्हेक्षण सुरू

कोल्हापूर : शहरात गेल्या पाच महिन्यांत ५२ डेंग्यूसदृश रुग्ण आढळले असून त्याची गांभीर्याने दखल घेऊन संपूर्ण शहरभर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून सर्वच घरांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे, अशी माहिती महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी महापौर शोभा बोंद्रे यांनी डेंग्यूच्या साथीबाबत बोलविलेल्या बैठकीत दिली.

डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. म्हणूनच डेंग्यूबाबत महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. आरोग्य निरीक्षकांनी प्रत्येक प्रभागात स्वच्छता ठेवून परिसर डेंग्यूमुक्त ठेवावा, अशा सूचना महापौर बोंद्रे यांनी यावेळी दिल्या.

आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी नूतन महापौर बोंद्रे व उपमहापौर महेश सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर साथ रोग अधिकारी डॉ. रमेश जाधव यांनी प्रेझेंटेशनद्वारे डेंग्यूबाबतच्या उपाय योजनेची माहिती दिली.

डेंग्यू प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत शहरातील सर्वच कुटुंबांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. शौचालयांचे व्हेंट पाईपला जाळी किंवा कापड बांधणे, शहरातील उघड्यावर असलेल्या टायर जप्त करणे, साठवूण ठेवलेल्या पाण्यामध्ये डास, अळी आहेत का? याबाबत सर्व्हेक्षण करणे, धूर व औषध फवारणी करणे. ताप आलेल्या रुग्णांचेही सर्व्हेक्षण करण्याबाबत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

आरोग्यविभागाकडे किटकनाशके व जंतुनाशकांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला असल्याचेही स्पष्टीकरण देण्यात आले. शहरातील झोपडपट्टी व गरीब, गरजू रुग्णांना अल्पदरात औषधोपचार करण्यात यावा. प्रत्येक प्रभागनिहाय स्वच्छता मोहीम हाती घ्यावी अशा सूचना उपमहापौर महेश सावंत यांनी मांडल्या.

सभागृहनेता दिलीप पवार यांनी शहरामध्ये नालेसफाई सुरू आहे का? भागातील गटर स्वच्छ करता का? धूर व औषध फवारणी महिन्यातून किती वेळा करता? याबाबत विचारणा केली. मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी त्याचा खुलासा केला.

यावेळी परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण, प्राथमिक शिक्षण समिती सभापती वनिता देठे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुरेखा शहा, प्रभाग समिती सभापती शोभा कवाळे, अति.आयुक्त श्रीधर पाटणकर, वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

महापौरांचे नागरिकांना आवाहन

  1. - घरामध्ये व आजूबाजूस सांडपाणी व कचरा साचून राहणार नाही याची खबरदारी घ्या.
  2. - घरामध्ये वापरासाठी भरून ठेवलेले पाण्याचे कंटेनर झाकून ठेवावेत.
  3. - साठवून ठेवलेले पाण्याचे कंटेनर व भांडी आठवड्यातून एकवेळा कोरडी करून स्वच्छ ठेवावीत.
  4. - घरामध्ये औषध फवारणीसाठी आलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.
  5. - नारळाच्या करवंट्या, टायर यांची वेळीच विल्हेवाट लावावी.
  6. - फ्रिजच्या मागील जाळ्या स्वच्छ ठेवाव्यात. झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नये.

 

कोणती उपाययोजना करण्यात येत आहे ?

  1. - शहरात २३८२० व्हेंट पाईपला जाळी बसविली.
  2. - आतापर्यंत १४०१ टायर्स जप्त करण्यात आल्या.
  3. - डेंग्यू प्रतिबंधात्मक कारवाईसाठी शहरात ३०० पथके कार्यरत.
  4. - आज अखेर सर्वेक्षण केलेल्या घरांची संख्या ७७,६०८.
  5. - डास व आळी सापडलेल्या घरांची संख्या १६३०.
  6. - शहरामध्ये ७७,६०८ घरांमध्ये डेंग्यूबाबत जनजागृती पत्रकांचे वाटप.

 

नाले सफाईचे काम सुरू

  1. - शहरातील ४७६ नाल्यांपैकी ४२० नाल्यांची सफाई
  2. - जेसीबीच्या साहाय्याने ३३६ नाल्यांपैकी १७७ नाल्यांची सफाई.
  3. - गोमती व जयंती नाल्यांची पोकलँन्डद्वारे १३ कि.मी पैकी ७.५ कि.मी. अंतराची सफाई पूर्ण.
  4. - उर्वरित सर्व नाल्यांची ५ जून पर्यंत सफाई पूर्ण करण्यात येणार.
  5. - प्रत्येक प्रभागात आठवड्यातून २ वेळा धूर फवारणी व १५ दिवसांतून एकदा औषध फवारणी करणार.

 

Web Title: Kolhapur: Be cautious about dengue: 52% dengue patients, house survey started in five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.