देशातील कुख्यात गुंडांसाठी कोल्हापूर बनले आश्रयस्थान, पोलिस यंत्रणा अनभिज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 02:29 PM2023-07-17T14:29:47+5:302023-07-17T14:30:03+5:30

परप्रांतीय गुन्हेगारांचा कोल्हापुरात वावर वाढल्यामुळे स्थानिक गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे

Kolhapur became a haven for notorious gangsters of the country, the police system was unaware | देशातील कुख्यात गुंडांसाठी कोल्हापूर बनले आश्रयस्थान, पोलिस यंत्रणा अनभिज्ञ

देशातील कुख्यात गुंडांसाठी कोल्हापूर बनले आश्रयस्थान, पोलिस यंत्रणा अनभिज्ञ

googlenewsNext

कोल्हापूर : रेल्वेसह विमानाने जलद होणारे दळणवळण, लपण्यासाठी जागांची उपलब्धता, स्थानिक गुन्हेगारांची मदत आणि गोव्यात किंवा कर्नाटकात जाण्यासाठी सोयीचे मार्ग यामुळे उत्तर भारतासह कर्नाटक, ओडिसातील कुख्यात गुंडांसाठी कोल्हापूर आश्रयस्थान बनले आहे. गांजा तस्करीपासून ते दरोड्यांपर्यंत अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये कुख्यात परप्रांतीय गुन्हेगारांचा सहभाग वाढत असल्याने पोलिसांसमोर हे नवे आव्हान निर्माण झाले आहे.

पहिली घटना : कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर बालिंगा येथे कात्यायनी ज्वेलर्सवर आठ जूनला सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी दोघांवर गोळ्या झाडून सुमारे तीन किलो सोन्याचे दागिने आणि दीड लाखांची रोकड लंपास केली होती. त्या गुन्ह्यातील चार परप्रांतीय दरोडेखोरांचा आठवडाभर कोल्हापुरात मुक्काम होता.

दुसरी घटना : पंजाबचे अमृतसर पोलिस आणि कोल्हापूर पोलिसांनी १४ जुलै रोजी पंजाबमधील कुख्यात पुरिया गँगमधील शार्पशूटर दीपक राठी याला कोल्हापुरातील रंकाळा परिसरातून जेरबंद केले. त्याच्यावर सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोन जूनपासून त्याचा मुक्काम कोल्हापुरात होता.

अलीकडच्या काळातील या दोन घटना प्रातिनिधिक आहेत. गांजा आणि गुटखा तस्करी करणारे ओडिसा, कर्नाटकातील तस्कर यापूर्वी अनेकदा पोलिसांच्या हाती लागले आहेत. मद्य तस्करी करणाऱ्या अवैध व्यावसायिकांचीही मोठी यादी आहे. गेल्या काही वर्षात इचलकरंजीत अवैध शस्त्र तस्करांचा अड्डा होता.

कामाच्या शोधात आलेल्या काही परप्रांतीयांनी आता गुन्हेगारी क्षेत्रात बस्तान बसवले असून, जुगार अड्ड्यांपासून ते खंडणीपर्यंतच्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग वाढल्याचे दिसत आहे. बालिंगा दरोड्यातील परप्रांतीय गुन्हेगारांनी तर सुपारी घेऊन दरोडा घातला. अशा परप्रांतीय गुन्हेगारांचा कोल्हापुरात वावर वाढल्यामुळे स्थानिक गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे.

पोलिसांचे अपयश

परप्रांतीय गुन्हेगार कोल्हापुरात येऊन राहतात. गंभीर गुन्हे करतात. स्थानिक गुन्हेगारांची मदत घेऊन पळून जातात, तरीही पोलिसांना यांचा सुगावा कसा लागत नाही? याचे आश्चर्य वाटते. पोलिसांच्या अपयशामुळे गुन्हेगारांना कोल्हापूर सुरक्षित वाटत आहे.

स्थानिक नागरिकही जबाबदार

भाडेकरू ठेवताना त्यांच्या ओळखपत्रांसह सर्व माहिती स्थानिक पोलिस ठाण्यांना देणे बंधनकारक आहे. याचे पालन स्थानिक नागरिकांकडून होत नाही. असे नागरिक अप्रत्यक्षरीत्या गुन्हेगारांचे आश्रयदाते ठरत आहेत.

राठीच्या साथीदारांची चौकशी

पुरिया गँगमधील शार्पशूटर राठी हा गेल्या दीड महिन्यांपासून कोल्हापुरात राहत होता. कुस्तीच्या तयारीसाठी पंजाबमधून कोल्हापुरात आलेले त्याचे काही गावाकडील मित्र आणि नातेवाइकांनी त्याला आश्रय दिला होता. मात्र, तो कुख्यात गुन्हेगार असल्याची माहिती असूनही त्याला आश्रय कसा दिला? त्याचा स्थानिक गुन्हेगारांशी संपर्क होता काय? त्याने कोल्हापुरात काही गुन्हेगारी कृत्ये केली आहेत काय? याचा शोध घेण्यासाठी राठीच्या मित्रांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Kolhapur became a haven for notorious gangsters of the country, the police system was unaware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.