कोल्हापूर : पाया न लागल्याने पर्यायी शिवाजी पुलाचे काम पुन्हा थांबवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 02:25 PM2018-06-12T14:25:55+5:302018-06-12T14:25:55+5:30
पर्यायी शिवाजी पुलाच्या कॉलमच्या पायासाठी साडेचार मीटर खोल अंतरापर्यंत कठीण दगड लागण्याची शक्यता असताना सुमारे नऊ मीटर खुदाई करूनही पाया न लागल्याने हतबल झालेल्या यंत्रणेने सोमवारी दुपारनंतर खुदाईचे काम थांबविले.
कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या कॉलमच्या पायासाठी साडेचार मीटर खोल अंतरापर्यंत कठीण दगड लागण्याची शक्यता असताना सुमारे नऊ मीटर खुदाई करूनही पाया न लागल्याने हतबल झालेल्या यंत्रणेने सोमवारी दुपारनंतर खुदाईचे काम थांबविले.
पाया न लागल्याने आता कॉलमचे डिझाईन बदलावे लागणार आहे. त्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार शासनाच्या मुंबईतील संकल्प चित्र मंडळाकडे आहेत. या मंडळाकडून जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत हे काम थांबविण्यात आले आहे. त्यामुळे या कामासाठी आता पुन्हा पावसाळ्यानंतरच प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पर्यायी शिवाजी पुलाच्या कामांमध्ये वारंवार अडचणींचा डोंगर उभारत आहे. ‘पुरातत्त्व’चा परवाना मिळाल्यानंतरही या पुलामागील अडथळ्यांची मालिका अद्याप संपलेली नाही. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दि. ४ जूनला दिल्लीत राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणातील मंजुरीनंतर हिरवा कंदील मिळाला. त्यानंतर दि. ७ जूनला हे काम प्रत्यक्षात सुरू झाले.
यावेळी कॉलमसाठी जमिनीपासून किमान साडेचार मीटर अंतरावर कठीण दगड लागण्याची अपेक्षा होती. त्यादृष्टीने निविदेत खर्चाची तरतूद केली; पण गेल्या सहा दिवसांत पोकलॅन मशीनने सुमारे नऊ मीटर खोलवर खुदाई करूनही पायासाठी अपेक्षित खडक न लागल्याने ठेकेदार नाराज झाले; पण पाया न लागल्याने सोमवारी दुपारी हे काम थांबविले.
खुदाई केलेल्या जागेचे मोजमाप करण्यात आले, यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे, उपअभियंता संपत अबदार, ठेकेदार एन. डी. लाड, आदी उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)
आता कॉलमचे डिझाईन बदलावे लागण्याची शक्यता आहे. त्यासाठीचे सर्व अधिकार हे अधीक्षक अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे शासनाच्या मुंबईतील संकल्प चित्र मंडळातील डिझाईन सर्कलकडून या कॉलमचे हेवी डिझायन तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मंडळाकडून मिळणाऱ्या प्रतिसादाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
खुदाईत विहीर?
पुलाच्या कॉलमचा पाया निश्चित केलेल्या जागेत सुमारे नऊ मीटरपर्यंत खुदाई करताना त्या जागेत फक्त मातीच मिळाल्याने यापूर्वी जुन्या शिवाजी पुलाचे बांधकाम करतेवेळी पाण्याच्या आवश्यकतेसाठी येथे तात्पुरती विहीर निर्माण केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या गोलाकार खुदाईच्या जागेचा साडेतीन मीटरचा परिघ असून सुमारे १८ फूट खोल आहे. वरील गोलाकार बाजू रूंद तर तळाचा भाग निमुळता असल्याचे खुदाईवेळी दिसून आले.
खर्चाचे बजेट वाढणार
पर्यायी शिवाजी पुलाच्या खर्चाचे बजेट नेहमीच वाढत आहे. कधी ९, कधी १५ तर कधी १२ कोटींपर्यंत या खर्चाच्या निविदा निघत गेल्या. पुलाचे ८० टक्के सुमारे साडेनऊ कोटींचे काम नवी मुंबईच्या बांका कन्स्ट्रक्शनने पूर्ण केल्यानंतर उर्वरित २० टक्के काम सुमारे ३ कोटी ०५ लाख रुपये खर्चाच्या निविदेतून गोव्याच्या आसमास कन्स्ट्रक्शनने घेतले.
आता पाया न लागल्यामुळे त्याच जागेत हेवी डिझायन नव्याने बनविणे अगर थोड्या अलीकडे जागेत नव्याने कॉलमसाठी पायाखुदाई करावी लागणार आहे. डिझाईनमध्ये फरक पडल्याने आता पुलाचे खर्चाचे बजेट पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
बुधवारी पुन्हा पाहणी
मुंबईतील संकल्प चित्र मंडळाचे सर्कल डिझायनर पुलाच्या पाहणीसाठी कोल्हापुरात दाखल होणार आहेत. त्यानंतर पुढील चालना मिळणार आहे.