कोल्हापूर : गुलालाच्या उधळणीला भेसळीची लागण, प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 07:26 PM2018-03-30T19:26:28+5:302018-03-30T20:00:07+5:30
‘दख्खनचा राजा’ श्री क्षेत्र जोतिबाच्या चैत्री यात्रेत गुलाल अन् खोबऱ्याच्या उधळणीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचा फायदा घेत काही व्यापारी निकृष्ट दर्जाचा गुलाल विकतात. त्यामुळे भाविकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. ही भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी होत आहे.
कोल्हापूर : ‘दख्खनचा राजा’ श्री क्षेत्र जोतिबाच्या चैत्री यात्रेत गुलाल अन् खोबऱ्याच्या उधळणीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचा फायदा घेत काही व्यापारी निकृष्ट दर्जाचा गुलाल विकतात. त्यामुळे भाविकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. ही भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी होत आहे.
पंढरपूरच्या विठूरायाचा बुक्का, सौंदत्तीच्या रेणुकामातेचा भंडारा व ‘दख्खनचा राजा’ श्री क्षेत्र जोतिबाचा गुलाल कपाळी लावल्यानंतर भाविकाला जे आत्मिक समाधान लाभते. त्याची जोड अन्य कशालाही लागू होत नाही. मात्र, त्याचा फायदा घेत अनेक जण निकृष्ट दर्जाचा माल यात्राकाळात विकतात.
‘चांगभलं रे चांगभलं...ऽऽ देवा जोतिबा चांगभलंऽऽ’, ‘जोतिबाच्या नावानं चांगभलंऽऽचा गजर...’,गुलाल-खोबऱ्याची उधळण ही यात्रेची पारंपरिक पद्धत आहे. गुलालाशिवाय ही यात्रा संपन्न होत नाही. जोतिबा यात्रेचे प्रतीक असणाऱ्या गुलालास या काळात मोठी मागणी असते. त्यामुळे काही व्यापारी निकृष्ट दर्जाचा गुलाल विक्री करतात.
त्यामुळे अनेकदा यात्रेकरूंच्या अंगावर हा गुलाल उधळल्यानंतर त्यांच्या अंगाला खाज उठणे, पुरळ उठणे, प्रसंगी रासायनिक प्रक्रिया होऊन चेहरा सुजणे, नाकावाटे रासायनिक गुलाल गेल्याने श्वासोश्वास करण्यास त्रास होणे, अशा अनेक आरोग्याच्या प्रकारांना भाविकांना सामोरे जावे लागते. याची शक्यता गृहीत धरून अन्न व औषध प्रशासनाने निकृष्ट दर्जाचा गुलाल विकणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारावा. यासह गुलालाची मर्यादित स्वरूपात उधळण व्हावी. याकरिताही प्रबोधन होण्याची आवश्यकता भाविकांकडून व्यक्त होत आहे.
निकृष्ट व रासायनिक गुलालाची उधळण केल्यानंतर काही भाविकांना तत्काळ त्रास होतो तर काहींना एक किंवा दोन दिवसांनी त्याचा त्रास होतो. त्यात प्रथम पुरळ उठणे, अंगाला खाज उठणे, चेहरा सुजणे, उधळण केलेल्या गुलाल नाकावाटे शरीरात गेल्यास रिअॅक्शन येणे, प्रसंगी श्वासोश्वास घेण्यास त्रास होणे, आदी आरोग्याच्या समस्या उद्भवतात. याकरिता चांगल्या दर्जाचाच गुलाल भाविकांनी वापरावा. शक्यतो कमी गुलालाची उधळण करणे ही बाब सुद्धा गरजेची बनली आहे.
-डॉ. गणेश ढवळशंख,
त्वचारोग तज्ज्ञ
स्थानिक व्यापारी चांगल्या दर्जाचाच सरपंच, समाधान, स्टार ब्रँडचाच गुलाल विक्री करतात. आरोग्याला घातक गुलालाची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने या काळात करावी. निकृष्ट दर्जाच्या गुलालाची विक्री बंद होईल व भाविकांना यात्रेचा आनंद द्विगुणित करता येईल.
- सुशांत कोकाटे,
पूजा साहित्य विक्रेते, वाडी रत्नागिरी (जोतिबा डोंगर)