कोल्हापूर : भटक्या विमुक्तांचे आंदोलन मागे : जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 06:43 PM2018-04-27T18:43:04+5:302018-04-27T18:43:04+5:30
कोडोली (ता. पन्हाळा) येथे वास्तव्य असलेल्या डवरी समाजाला येत्या चार महिन्यांत घरे बांधून देण्यास सुरुवात होईल, या पद्धतीने नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी संबंधित यंत्रणेला येथे दिल्या. यामुळे भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले.
कोल्हापूर : कोडोली (ता. पन्हाळा) येथे वास्तव्य असलेल्या डवरी समाजाला येत्या चार महिन्यांत घरे बांधून देण्यास सुरुवात होईल, या पद्धतीने नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी संबंधित यंत्रणेला येथे दिल्या. यामुळे भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले.
कोडोली येथे अनेक वर्षांपासून डवरी समाजाचे वास्तव्य आहे. येथील जागा त्यांच्या हक्काची असून, त्यांना या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत शासकीय योजनेतून घरे बांधून द्यावीत, यासह विविध मागण्यांसाठी भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे बुधवार (दि. २५)पासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत आंदोलकांची चर्चा झाली. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी कोडोली येथील जागेवर डवरी समाजातील लोकांसाठी येत्या चार महिन्यांत घरे बांधण्याच्या कामाला सुरुवात करावी, अशी सूचना संबंधित यंत्रणेला दिली.
सकारात्मक चर्चा झाल्याने हे आंदोलन मागे घेतल्याचे अशोक लाखे, शशांक देशपांडे, सुभाष साळोखे यांनी जाहीर केले. यानंतर त्यांनी आंदोलनस्थळी येऊन जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या चर्चेचा तपशील विशद केला. तसेच चार महिन्यांत घरबांधणीला सुरुवात न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शशांक देशपांडे यांनी दिला.