कोल्हापूर : बाळूमामांचा प्रत्यक्ष सहवास लाभला : डी. वाय. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 06:02 PM2019-01-14T18:02:20+5:302019-01-14T18:03:40+5:30
आदमापूरचे संत सद्गुरू बाळूमामा यांचा दोन तास प्रत्यक्ष सहवास लाभल्याच्या आठवणी बिहारचे माजी राज्यपाल पद्यश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी सांगितल्या.
कोल्हापूर : आदमापूरचे संत सद्गुरू बाळूमामा यांचा दोन तास प्रत्यक्ष सहवास लाभल्याच्या आठवणी बिहारचे माजी राज्यपाल पद्यश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी सांगितल्या.
राम तोरसे यांनी लिहिलेल्या ‘सदगुरू बाळूमामा महात्म्य’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते सोमवारी त्यांच्या निवासस्थानी झाले. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. पाटील यांनी सद्गुरू बाळूमामा यांच्यासोबत १९६४ मध्ये आदमापूर मुक्कामी प्रत्यक्ष भेट झाल्याची आठवण या कार्यक्रमात सांगून त्यांच्याशी आध्यात्मिक विषयावर चर्चा घडल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. पाटील यांनी या पुस्तकाला शुभेच्छा दिल्या.
या छोटेखानी समारंभात या पुस्तकाचे लेखक आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे वरिष्ठ जलअभियंता राम तोरसे, बाळूमामांचे भक्त सुधाकर परमने, गणेश नेर्लेकर-देसाई, डॉ. वासुदेव देशिंगकर, आर्य समाज संचलित शाहू दयानंद हायस्कूलचे चेअरमन दिलीपसिंह कौलवकर-पाटील, तसेच केदार तोरसे, आदी मान्यवर उपस्थित होते.