कोल्हापूर : मुलींच्या छेडछाडीचे सर्वाधिक गुन्हे साताऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 11:34 AM2019-01-01T11:34:44+5:302019-01-01T11:38:10+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, बसस्टॉप आदी परिसरात असभ्य वर्तनाबरोबरच तरुणींच्या पाठीमागे लागेल त्याला ‘निर्भया’ची लाठी खावावी लागणार आहे. कोल्हापूर विभागातील सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमध्ये ‘निर्भया’ने कठोर कारवाई केली आहे. तरुणी-महिलांना आता ‘निर्भया पथकाचा आधार, बनवा जीवन आपले रूबाबदार’ असा संदेश यानिमित्ताने दिला जात आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, बसस्टॉप आदी परिसरात असभ्य वर्तनाबरोबरच तरुणींच्या पाठीमागे लागेल त्याला ‘निर्भया’ची लाठी खावावी लागणार आहे. कोल्हापूर विभागातील सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमध्ये ‘निर्भया’ने कठोर कारवाई केली आहे. तरुणी-महिलांना आता ‘निर्भया पथकाचा आधार, बनवा जीवन आपले रूबाबदार’ असा संदेश यानिमित्ताने दिला जात आहे.
मावळत्या वर्षात परिक्षेत्रात तरुणी व महिलांची छेड काढणाऱ्या ४६ हजार २८१ युवकांना ‘निर्भया’ पथकाने ‘खाकीचा प्रसाद’ दिला आहे. सर्वाधिक छेडछाडीचे प्रमाण सातारा जिल्ह्यात आहे. पुणे ग्रामीणमध्ये हे प्रमाण कमी आहे. गतवर्षातील पथकाच्या या कारवाईचा परिक्षेत्रात चांगलाच दबदबा निर्माण झाला आहे.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील १४६ पोलीस ठाण्यांमध्ये तरुणी व महिलांच्या सुरक्षेसाठी ‘निर्भया’ पथकाची स्थापना केली. प्रत्येक जिल्ह्यात सध्या दहा पथके आहेत. त्यामध्ये एक अधिकारी व चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
या पथकांना स्वतंत्र ड्रेसकोड व दिमतीला वेगवान दुचाकी व चारचाकी देण्यात आल्या आहेत. ‘निर्भया’ पथकाने विविध ठिकाणी तरुणींची छेड काढणे, शेरेबाजी करणे, रस्ता अडविणे, पाठलाग करणे, हातवारे करणे अशी दुष्कृत्ये करणाऱ्या ४६ हजार २८१ तरुणांना ‘खाकी’चा प्रसाद देत कारवाई केली आहे.
पथकाने १२०० ठिकाणी प्रबोधन कार्यक्रम घेतले आहेत. ४ हजार जणांचे समुपदेशन केले आहे. कारवाईची चाहूल कोणालाच लागत नाही. छेडछाड करत असल्याचे व्हिडिओ शूटिंग करून त्याला रंगेहात पकडले जाते.
निर्भया या तक्रारींवर करते कारवाई
तुमचा कोणी पाठलाग करून छेडछाड करीत असेल, मोबाईल, सोशल मीडियाद्वारे जास्त त्रास देत असेल, दैनंदिन येण्या-जाण्याच्या रस्त्यावर मुले छेड काढत असतील किंवा असे एखादे कृत्य की ज्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल, भावनिकरीत्या ब्लॅकमेल करणे, अश्लील बोलणे, शिवीगाळ करणे, मोबाईलवर अश्लील चित्रफीत, फोटो तयार करून इतरांना पाठविणे, अश्लील भाषेत बोलणे, मॅसेज पाठविणे, मानसिक त्रास होईल, मनाला लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन करणाऱ्यांची निर्भया पथक गय करणार नाही.
कारवाईची आकडेवारी अशी
- कोल्हापूर-१०५४७
- सांगली-१२६४५
- सातारा-१३५५९
- सोलापूर ग्रामीण-७६२०
- पुणे ग्रामीण-१९२८
युवती व महिलांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. ही कारवाई अधिक सक्षम आणि कठोर करण्यावर आमचा भर राहील.
- आरती नांद्रेकर,
‘निर्भया’ कोल्हापूर विभागपथक प्रमुख