कोल्हापूर : जैववैद्यकीय कचरा प्रकल्प महापालिका चालवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:38 PM2018-06-29T12:38:09+5:302018-06-29T12:43:30+5:30
कोल्हापूर शहरातील डॉक्टरांकडून प्राप्त होत असलेल्या तक्रारी तसेच भाडे व रॉयल्टीची थकबाकी या दोन प्रमुख कारणांस्तव महानगरपालिका प्रशासनाने जैववैद्यकीय कचरा विघटन प्रकल्पाचा ठेका ‘नेचर अॅँड नीड’ या संस्थेकडून गुरुवारी काढून घेतला. आता हा प्रकल्प महापालिका आरोग्य खाते स्वत:च चालविणार असून, त्यासाठीची आवश्यक ती यंत्रणा तातडीने उभी केली.
कोल्हापूर : शहरातील डॉक्टरांकडून प्राप्त होत असलेल्या तक्रारी तसेच भाडे व रॉयल्टीची थकबाकी या दोन प्रमुख कारणांस्तव महानगरपालिका प्रशासनाने जैववैद्यकीय कचरा विघटन प्रकल्पाचा ठेका ‘नेचर अॅँड नीड’ या संस्थेकडून गुरुवारी काढून घेतला. आता हा प्रकल्प महापालिका आरोग्य खाते स्वत:च चालविणार असून, त्यासाठीची आवश्यक ती यंत्रणा तातडीने उभी केली.
शहरात निर्माण होणारा जैववैद्यकीय कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने २०१२ मध्ये निविदा मागविल्या होत्या. त्यावेळी ‘नेचर अॅँड नीड’ या संस्थेची निविदा मंजूर करून त्यांना पुढील दहा वर्षांकरिता ठेका देण्यात आला होता.
शहरातील सर्व दवाखान्यांतून जैववैद्यकीय कचरा गोळा करून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती; परंतु या संस्थेबद्दल शहरातील डॉक्टर्स मंडळींकडून तक्रारी व्हायला लागल्या. त्यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तक्रारींत तथ्य आढळले होते. शिवाय या प्रकल्पात आवश्यक ती उपकरणेही नसल्याची बाब समोर आली होती. त्यावेळी महापालिकेच्या प्रशासनाने त्यांना नोटीस देऊन ठेका काढून घेण्याचा इशारा दिला होता.
महापालिकेच्या नोटिसीविरुद्ध ‘नेचर’ डायरेक्टर्सनी २०१३ मध्ये राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली. त्यावेळी लवादाने पर्यायी व्यवस्था निर्माण झाल्याशिवाय ठेका रद्द करू नये, असा निकाल दिला होता. त्यानंतर ‘नेचर’च्या कामात सुधारणा झाली नाही. त्यांच्याविरुद्धच्या तक्रारी सुरूच होत्या. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासनाने त्यांना पुन्हा नोटीस दिली.
भाड्याची ६० हजार व रॉयल्टीची ५३ लाख ६७ हजार ६०० रुपयांची थकबाकी तातडीने भरावी, अशी सूचना करण्यात आली होती. त्यासाठी एक महिन्याची मुदत त्यांना दिली होती; पण मुदतीत त्यांनी ही थकबाकी भरली नाही; म्हणून कायद्यातील ८१ ब प्रमाणे प्रक्रिया राबवून गुरुवारी कंपनीचा ठेका रद्द करून प्रकल्प ताब्यात घेतला.
दरम्यान, येथील प्रजासत्ताक संस्थेने ठेका काढून घेत असताना महापालिकेच्या प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था उभी करावी, अशी मागणी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली होती. तत्पूर्वी तशी व्यवस्था झाली होती.
महापालिकेची यंत्रणा कार्यान्वित
जैव व वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकामी महानगरपालिकेने आवश्यक यंत्रणा उभी केली असून, महापालिका स्वत: सक्षमपणे जैव व वैद्यकीय कचरा प्रकल्प चालविणार आहे. या प्रकल्पासाठी पर्यावरण संवर्धन अधिकारी, आरोग्य निरीक्षक, सहायक आरोग्य निरीक्षक व १२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जैववैद्यकीय कचरा संकलन करण्यासाठी स्वतंत्र चार वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणचा ईटीपी, चिमणी, इत्यादी बाबींकरिता स्वतंत्र तांत्रिक सल्लागार नेमलेला आहे. महापालिका आज, शुक्रवारपासून स्वत: कचऱ्यावर प्रक्रिया करणार आहे.
यापूर्वीही झाली होती कारवाई
महापालिकेच्या आरक्षित असलेल्या जागेपैकी १० हजार चौ. फू. खुली जागा नेचर इन नीड, सातारा या संस्थेस दर चौ. फुटास एक रुपया या वार्षिक भाड्याने १० वर्षे मुदतीने व मासिक रॉयल्टी १ लाख ०८ हजार रुपये भरण्याच्या अटीवर दि. ११ सप्टेंबर २०१२ रोजी देण्यात आली होती. तथापि सदर संस्थेच्या कामकाजातील गंभीर त्रुटींमुळे आरोग्यविघातक परिस्थिती निर्माण होऊ शकत असल्याच्या कारणास्तव तसेच संस्थेकडून होत असलेला निष्काळजीपणा व कामातील गंभीर त्रुटींमुळे २१ सप्टेंबर २०१३ रोजी सदर संस्थेस दिलेला ठेका रद्द करण्यात आला होता; पण त्यांच्याकडून कामात सुधारणा झाली नाही.
कोल्हापूर शहरातील जैव वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचा नेचर अॅन्ड नीड या संस्थेचा ठेका महानगरपालिका प्रशासनाने रद्द केला. या प्रकल्पाला गुरुवारी महापालिका अधिकाऱ्यांनी टाळे ठोकले. यावेळी इस्टेट अधिकारी प्रमोद बराले व मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील उपस्थित होते.