कोल्हापूर भाजप महानगर जिल्हाध्यपदी विजय जाधव
By समीर देशपांडे | Published: July 19, 2023 12:54 PM2023-07-19T12:54:28+5:302023-07-19T12:55:51+5:30
कोल्हापूर लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राहूल देसाई आणि हातकणंगले लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राजवर्धन निंबाळकर यांची नियुक्ती
कोल्हापूर : गेले काही महिने रखडलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्षपदी विजय जाधव यांची तर कोल्हापूर लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राहूल देसाई आणि हातकणंगले लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राजवर्धन निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्या पाहता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच शिफारस केलेल्या नावांना संधी देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
विजय जाधव हे सध्या भाजप जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. ते १९८६ पासून भाजपचे काम करत आहेत. युवा मोर्चा आणि भाजपमध्ये गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या जाधव यांनी मंत्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि आरोग्यविषयक उपक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले होते.
राहूल देसाई हे काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव असून त्यांनी २०१६ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत.
राजवर्धन निंबाळकर हे सध्या शिरोळचे भाजपचे तालुकाध्यक्ष असून त्यांचे वडील राष्ट्रवादीसोबत होते. ते जिल्हा बँकेचे अध्यक्षही होते. २०१७ साली निंबाळकर जिल्हा परिषदेवर निवडून आले होते.