कोल्हापूर : शिरोलीत स्फोट, दहाजण जखमी, दोघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:28 PM2018-05-30T12:28:59+5:302018-05-30T15:47:23+5:30
हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील माळवाडी परिसरातील घरामध्ये बुधवारी सातच्या सुमारास झालेल्या रेफ्रिजरेटरच्या स्फोटात दहा जण जखमी झाले. जखमींमध्ये लहान मुलगी आणि दोन महिलांचा समावेश आहे.
कोल्हापूर/शिरोली : हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील माळवाडी परिसरातील घरामध्ये बुधवारी सकाळी साडेसातच्या झालेल्या स्फोटात दहा जण जखमी झाले. जखमींमध्ये लहान मुलगी आणि दोन महिलांचा समावेश आहे.
महेन्द्र पाटील (जखमी)
मारुती सुतार (जखमी)
शिरोली येथील हौसिंग सोसायटी मधील बंगल्यात गॅस सिलेंडरचा स्फोट होवून लागलेल्या आगीत सुधाराणी काडगोंड, श्रावणी काडगोंड, निल्लवा काडगोंड, कृष्णा केदारी पाटील, महेंद्र कृष्णा पाटील, सागर जनार्दन पाटील, निलेश सुखदेव पाटील, निलेश महादेव आढाव, मारूती सुतार , दिनकर जाधव हे दहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
निलेश आढाव (जखमी)
सुधाराणी काडगोंडा (जखमी)
निलव्वा काडगोंडा (जखमी)
दिनकर जाधव (जखमी)
श्रावणी काडगोंडा (जखमी)
अधिक माहिती अशी शिरोली-माळवाडी भागात ही हौसिंग सोसायटी आहे. या सोसायटीत कृष्णा केदारी पाटील यांचा दुमजली बंगला आहे. यापैकी पहिला मजला दर्याप्पा पाटील यांच्या परिवाराला भाड्याने राहण्यासाठी दिला आहे. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे दर्याप्पा काडगोंड यांच्या पत्नी सुधाराणी या जेवण करत होत्या. इतक्यात गॅस सिलेंडरच्या पाईपला आग लागली म्हणून घरातील सर्वजण बाहेर आले.
आग विझवण्यासाठी घरातील व शेजारच्या लोक पाणी व माती टाकून आग विझवत होते. तोच जोरात मोठा स्फोट झाला,आणि घरातीला आगीचा लोट खिडकीतून बाहेर आले आणि बाहेर घराशेजारी उभे असलेले हे दहा जण या आगीत होरपळून जखमी झाले.
घराला आग लागली म्हणून दुसऱ्या मजल्यावर राहत असलेले घरमालक कृष्णा केदारी पाटील व त्यांचा मुलगा महेंद्र हे दोघेजण खाली येऊन आग विझविण्यासाठी धावले. तेही या आगीत भाजले. बंगल्याला आग लागली म्हणून शेजारीच असलेल्या शेतात पाणी पाजत असलेला सागर पाटील हा आग विझवण्यासाठी धावत गेला. आग आटोक्यात आणण्यासाठी सागर आगीवर माती टाकत असताना त्याच्याही पाठीला भाजले आहे.
याशिवाय निलेश पाटील, निलेश आढाव, मारूती सुतार हे आग विझवत असतानाच गॅसचा भडका उडाला, त्यात ते तिघेही भाजले. या आगीत एकूण दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी आठ जणांवर सीपीआर मध्ये तर दोघांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्फोटाचा मोठा आवाज...
हौसिंग सोसायटी मध्ये शांत वातावरण असल्याने सकाळी सात वाजता गॅस सिलेंडरचा स्फोट होवून मोठा आवाज झाला. आवाजाची तिव्रता इतकी मोठी होती की सुमारे दोन किलोमीटर अंतराच्या परिसरात त्याचा आवाज गेला होता.
स्फोट कशाचा संभ्रम...
घटनास्थळी गॅस सिलेंडरचा स्फोट होवून मोठा आवाज झाला. पण किचन रूम मधील गॅसची टाकी रेग्युलेटर व शेगडी आहे तशीच जाग्यावर होती. आणि रेफ्रीजरेटर पूर्ण पणे जळालेले होते. त्यामुळे रेफ्रीजरेटरचा स्फोट झाला असेच सर्वांना वाटत होते. पण अकरा वाजता शेजारील लोकांनी आत जाऊन पाहिल्यावर रेफ्रीजरेटर शेजारी असलेले सिलेंडर फुटुन त्यावर प्रापंचिक साहित्य पडल्याने सिलेंडर झाकुन गेले होते.
सिलेंडरचा स्फोट अकरा वाजता
गॅस सिलेंडर मधील गॅस संपूर्ण घरभरात पसरला होता. गॅसचा वास दुसऱ्या मजल्यावर राहणारे घरमालक पाटील यांना आल्यावर ते खाली आले, तोपर्यंत खालच्या मजल्यावर आग लागली होती. सुरुवातीला आग लागली आणि नंतर थोड्याच वेळाने स्फोट झाला.
आग विझवण्यासाठी शेजारी धावले
आग विझविण्यासाठी शेजाऱ्यांनी धाव घेतली, पण तेही जखमी झाले. त्यांनी शेजारची दोन तीन बोअरवेल सुरू करून पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शेतातील माती आणून आग आटोक्यात आणली. पण ही आग विझवण्यासाठी गेलेले सागर पाटील, निलेश पाटील, निलेश आढाव, मारूती सुतार हे शेजारी आगीत होरपळून जखमी झाले आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांची भेट
घटनास्थळाला जिल्हा पोलीस प्रमुख संजय मोहिते, अतिरिक्त पोलीस प्रमुख तिरूपती काकडे, पोलीस उपाधिक्षक सुरज गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, सरपंच शशिकांत खवरे ,तंटामुक अध्यक्ष सतीश पाटील यांनी भेट दिली.
नातेवाईकांची गर्दी
पुलाची शिरोलीत फ्रिज चा स्फोट झालेनंतर जखमींना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. अचानक एकावेळी आठ ते दहा रुग्ण दाखल झालेने डॉक्टरांसह परिचारीकांची धांदल उडाली. जखमींच्या नातेवाईकांनी सीपीआर आवारात गर्दी केली होती.