कोल्हापूर : चांगल्या गोष्टींची ओळख पुस्तकांमधून : उमेशचंद्र मोरे, ‘पुस्तकांचा गाव’ पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 05:49 PM2018-02-05T17:49:49+5:302018-02-05T17:54:14+5:30
कोल्हापूर : चांगल्या गोष्टींची ओळख आपणास पुस्तकांमधूनच होते. माणसाला माणूस म्हणून घडविण्याची ताकद पुस्तकांमध्ये आहे. त्यामुळे ‘पुस्तकांचा गाव’ या पुस्तकाची संकल्पना कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांनी केले.
शाहू स्मारक भवन येथे वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित ‘पुस्तकांचा गाव’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे संचालक विनय पाटील होते.
मोरे म्हणाले, वयाच्या दहाव्या वर्षी मुले खुनासारखे गुन्हे करीत आहेत. कायद्याचे परिणाम त्यांना माहिती नसतात. यासाठी स्त्रीभ्रूण हत्या, आरटीओ नियम, रॅगिंग कायदा, वाहतुकीचे नियम न पाळल्यास काय होऊ शकते याची माहिती होण्यासाठी ‘विधि वाचनकट्टा’ सुरूकरा, यासाठी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणतर्फे सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे संचालक विनय पाटील, महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी विश्वास सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, न्यू कॉलेजचे उपप्राचार्य टी. के. सलगर, दिनेश प्रभू, डॉ. शशिकांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते एस. वाय. कदम, वनिता कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुस्तकाचे लेखक युवराज कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वाचनकट्ट्याच्या कार्यकारी सदस्या भाग्यश्री शिंदे यांनी आभार मानले, तर वैदेही जोशी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
बालचमूंची बालसभा
डोंबाऱ्यांचा खेळ करणारी चिंधी, टागोरांच्या कथा, विनूची आई, वीरांच्या कथा, गुणवान सिक्रेट अशा छोट्या कथांनी मनावर व विचारांवर संस्कार केल्याचे विवेचन शालेय विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित बालसभेत गायत्री पाटील, श्रृती राऊत, विराज तलवार, साक्षी मालेकर, अन्शुल टेंबे, मिरासाहेब जमादार, संध्या काटकर, आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.