कोल्हापूर : महालक्ष्मी अन्नछत्रतर्फे पुस्तक पेढी योजना, गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 06:39 PM2018-07-06T18:39:38+5:302018-07-06T18:40:25+5:30
आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. अशा इयत्ता अकरावी ते पदवीपर्यंतच्या गरजू विद्यार्थ्यांसाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्यावतीने श्री महालक्ष्मी पुस्तक पेढी योजना सुरू करण्यात आली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि.९) या पेढीचा शुभारंभ होणार आहे.
कोल्हापूर : आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. अशा इयत्ता अकरावी ते पदवीपर्यंतच्या गरजू विद्यार्थ्यांसाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्यावतीने श्री महालक्ष्मी पुस्तक पेढी योजना सुरू करण्यात आली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि.९) या पेढीचा शुभारंभ होणार आहे.
या पेढी उपक्रमासाठी समाजातील दातृत्ववान व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. आपल्या कुटूंबातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची जुनी पुस्तके रद्दीत न घालता ही संस्थेकडे आणून द्यावीत. ही पुस्तके गरजू महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाटण्यात येणार आहेत.
पुढीलवर्षी ती पुन्हा संस्थेकडे जमा करून दुसऱ्या गरजू विद्यार्थ्याला दिली जातील. अशा रितीने हे काम पुढे सुरू राहील. तरी अधिकाधिक नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी पुस्तके पेढीला देवून या सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे असे आवाहन ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.
एक मुठ धान्य....
ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक मुठ धान्य द्या असे आवाहन केले आहे. ट्रस्टच्यावतीने अंबाबाईच्या परस्थ भक्तांसाठी अन्नछत्र चालवले जाते. तसेच समाजातील वंचित घटकाला जेवण पुरवले जाते. सोमवारी सायंकाळी सहा ते रात्री नऊ यावेळेत धर्मशाळेच्या हॉलमध्ये ते धान्याच्या स्वरुपात शुभेच्छा स्विकारणार आहेत.