कोल्हापूर : चौथीतील विद्यार्थ्यांनी लिहिली गोष्टीची पुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 03:26 PM2018-11-07T15:26:58+5:302018-11-07T16:12:05+5:30
अनुभव, कल्पनाविस्तारावर आधारित गोष्टीची पुस्तके चौथीच्या विद्यार्थ्यांनी लिहिली आहेत. वाचन आणि लेखनाला प्रोत्साहन देणारा उपक्रम राजारामपुरीतील नेहरू विद्यालयाने राबविला आहे.
संतोष मिठारी
कोल्हापूर : अनुभव, कल्पनाविस्तारावर आधारित गोष्टीची पुस्तके चौथीच्या विद्यार्थ्यांनी लिहिली आहेत. वाचन आणि लेखनाला प्रोत्साहन देणारा उपक्रम राजारामपुरीतील नेहरू विद्यालयाने राबविला आहे.
सध्या अनेक मुले मोबाईलच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे त्यांचा कुटुंबातील संवाद, वाचन आणि लेखन कमी झाले आहे. बहुतांश मुले स्वत:हून वाचन करतच नाहीत. अशा स्थितीत मुलांना स्वत: गोष्ट लिहून त्याचे पुस्तक तयार करायला लावणे. त्यातून त्यांच्यातील लेखकाचा शोध घेण्यासह त्यांच्या बुद्धिला चालना देण्याचा उपक्रम नेहरू विद्यालयाने केले आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यालयातील चौथीच्या २० विद्यार्थ्यांना जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील भाषाविषय सहाय्यक निशा काजवे आणि शिक्षिका सारिका पाटील यांनी प्रशिक्षण दिले.
क्वेस्टअंतर्गत या विद्यार्थ्यांना पुस्तक लेखनाचे प्रशिक्षण देण्यात आले. ‘आनंदी विद्यालय’ उपक्रमही राबविण्यात आला. त्यामध्ये पुस्तकांचा दवाखाना, वाचन, चित्रवर्णन, गोष्ट तयार करणे, शाब्दिक कोडी, विविध गणिती खेळ आदींचा समावेश होता. प्रशिक्षणानंतर या विद्यार्थ्यांकडून पुस्तके लिहून घेण्यात आली.
नारळ महागला, मदत का? करावी, शिक्षा कोणाला, चूक कोणाची, मदतीचा हात अशा विविध २० गोष्टींचे लेखन या विद्यार्थ्यांनी स्व: अनुभव आणि कल्पनाविस्तारावर आधारित केले. या उपक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वसुधा चव्हाण, शिक्षिका सुधा हजारे यांचे मार्गदर्शन लाभले.
उपक्रमातील सहभागी विद्यार्थी-विद्यार्थीनी
/>
गोष्टींची पुस्तके लिहिण्याचा हा उपक्रम तीन आठवड्यांचा होता. त्यामध्ये वैदेही चौगले, जागृती राणे, विराज देसाई, साईराज माने, हर्षदा घाटगे, समृद्धी पंडित, समर्थ पाटील, अभिज्ञा मिणचेकर, भक्ती कांबळे, सौजन्या महाडिक, अंकिता पाटील, साक्षी मिणचेकर, संस्कृती तुरूके, प्रथमेश कांबळे, माजिद शानेदिवाण, मयुरी मुदिगौंड, गौरी गिद्दे, नील दळवी, अक्षयनी नलवडे, कल्पना वाघमारे या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. त्यांनी कार्डशीटपेपरवर गोष्टी लिहून पुस्तके तयार केली आहेत. त्यामध्ये त्यांनी पूरक चित्रेही रेखाटली आहेत. आठ ते दहा पानांची पुस्तके आहेत.
सध्याच्या मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वाचन आणि लेखन संस्कृती वाढविण्याच्या उद्देशाने विद्यालयाने हा उपक्रम राबविला आहे. या गोष्टीच्या पुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वत:चे विचार, कल्पना मांडल्या आहेत. गोष्टीचे पुस्तक लिहिण्याचा हा उपक्रम आता प्रायोगिक तत्वावर वर्गपातळीवर राबविला असून पुढील टप्प्यात शाळा पातळीवर राबविण्याचा मानस आहे.
- सारिका पाटील,
वर्गशिक्षिका