कोल्हापूर हद्दवाढ: दोन्ही बाजूंचे एकमत करूनच तोडगा काढू - राजेश क्षीरसागर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 03:47 PM2022-09-20T15:47:32+5:302022-09-20T15:47:53+5:30

विरोधाला विरोध करून कोणत्याही समस्येचा मार्ग निघू शकत नाही.

Kolhapur border extension issue will be resolved only by consensus of both sides says Rajesh Kshirsagar | कोल्हापूर हद्दवाढ: दोन्ही बाजूंचे एकमत करूनच तोडगा काढू - राजेश क्षीरसागर

कोल्हापूर हद्दवाढ: दोन्ही बाजूंचे एकमत करूनच तोडगा काढू - राजेश क्षीरसागर

Next

कोल्हापूर : शहराची हद्दवाढ होणे ही नैसर्गिक बाब आहे म्हणूनच दोन्ही बाजूंचे एकमत करूनच हद्दवाढीबाबत सकारात्मक तोडगा काढला जाईल, असे आश्वासन राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले.

कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढविरोधी प्रस्तावित गावांमधील सर्वपक्षीय कृती समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी क्षीरसागर यांची भेट घेऊन निवेदन दिले. क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर वगळता राज्यातील पुणे, ठाणे, संभाजीनगर, नाशिक अशा महापालिकांची हद्दवाढ झाल्याने शहराशेजारील गावांचा विकास होऊन मूलभूत सोयीसुविधा नागरिकांना प्राप्त झाल्या आहेत. परंतु, कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीसाठी गावांचा विरोध होत असल्यास त्यांची भूमिकाही समजून घेणे आवश्यक आहे.

विरोधाला विरोध करून कोणत्याही समस्येचा मार्ग निघू शकत नाही. दोन्ही समिती प्रमुख पदाधिकाऱ्यांशी एकत्रित चर्चा करून संयुक्त समिती स्थापन करण्याबाबत प्रयत्नशील आहे. गावांच्या विकासाचा आराखडा तयार करून दोन्ही बाजूंचे एकमत करून हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून सकारात्मक तोडगा काढू.

यावेळी हद्दवाढ विरोधी समितीचे राजू माने म्हणाले, हद्दवाढीस समितीचा विरोध नाही. पण, प्रस्तावित गावांतील लोकांची भूमिका समजून घेतली जात नाही. अनेक गावांनी ‘गाव बंद’ आंदोलन सुरू केले आहे.

यावर बोलताना क्षीरसागर यांनी, ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात घेऊनच हा प्रश्न सुटणार आहे. प्रत्येक गोष्टीला विरोध करणे ही बाब चुकीची आहे. विचारांची देवाणघेवाण करून दोन्ही समित्यांची संयुक्तिक बैठक होणे गरजे आहे. हद्दवाढ झाल्यास आवश्यक निधी मंजुरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम आहेत. नागरिकांचे कोणतेही नुकसान होऊ नये याकरिता दोन्ही समित्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी.

यावेळी किशोर घाटगे, मंदार तपकिरे, कपिल सरनाईक, पीयूष चव्हाण, रूपेश इंगवले, हद्दवाढ विरोधी गावांमधील कृती समितीचे बबन शिंदे, प्रकाश टोपकर, सर्जेराव साळुंखे, सुधाकर म्हात्रे, शशिकांत पाटील, गजानन संकपाळ आदी उपस्थित होते.

Web Title: Kolhapur border extension issue will be resolved only by consensus of both sides says Rajesh Kshirsagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.