कोल्हापूर : लोखंडी प्लेटा चोरणाऱ्या दोघांना अटक, संतप्त नागरिकांनी केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 04:09 PM2018-09-06T16:09:31+5:302018-09-06T16:13:26+5:30
कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यांवरील बांधकामासाठी आणलेल्या २८ हजार किमतीच्या लोखंडी प्लेटा चोरून नेणाऱ्या दोघा चोरट्यांना नागरिकांनी रंगेहात पकडून बेदम मारहाण करीत करवीर पोलिसांच्या ताब्यात दिले.
कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यांवरील बांधकामासाठी आणलेल्या २८ हजार किमतीच्या लोखंडी प्लेटा चोरून नेणाऱ्या दोघा चोरट्यांना नागरिकांनी रंगेहात पकडून बेदम मारहाण करीत करवीर पोलिसांच्या ताब्यात दिले.
संशयित अभिजित राजू चव्हाण (वय २१, रा. विचारेमाळ), वसंत भूपाल मदरकुंडी (२९, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातील टेम्पो पोलिसांनी जप्त केला.
अधिक माहिती अशी, पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर नवीन पुलाचे बांधकाम काम सुरू आहे. त्यासाठी याठिकाणी लोखंडी प्लेटा ठेवल्या होत्या.
नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने काही दिवसांपासून हे काम बंद आहे. त्यामुळे या प्लेटा नदीकिनाऱ्याजवळ उघड्यावर ठेवल्या होत्या.
मंगळवारी रात्री संशयित अभिजित चव्हाण व वसंत मदरकुंडी टेम्पो घेऊन आले. ते सुमारे २८ लोखंडी प्लेटा टेम्पोत चढवीत असताना येथील सुरक्षारक्षकाने पाहिले. त्याने अभियंता नीलेश दिलीप पाटील यांना फोनवरून ही माहिती दिली. ते तत्काळ घटनास्थळी आले.
या प्रकाराची माहिती बावड्यातील नागरिकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी या दोघा संशयितांना बेदम मारहाण करीत करवीर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांना अटक दाखवून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.