चर्चा करुन कोल्हापूरची हद्दवाढ अशक्यच, राजकीय इच्छाशक्ती हवी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 14:03 IST2025-01-31T13:58:08+5:302025-01-31T14:03:00+5:30
राजेश क्षीरसागर आग्रही : अमल महाडिक, चंद्रदीप नरके यांचा अपेक्षेनुसारच विरोध कायम

चर्चा करुन कोल्हापूरची हद्दवाढ अशक्यच, राजकीय इच्छाशक्ती हवी
कोल्हापूर : गेली पाच दशके या ना त्या कारणाने रखडलेली कोल्हापूरची हद्दवाढ व्हावी यासाठी सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीने नव्याने रेटा लावला आहे. या समितीच्या बुधवारी शिवाजी पेठेत झालेल्या बैठकीत कोल्हापूर दक्षिण व करवीरच्या आमदारांनी हद्दवाढीसंबंधी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी झाली. म्हणून ‘लोकमत’ने गुरुवारी हद्दवाढीशी संबंधित तिन्ही आमदारांकडे हद्दवाढीसंबंधी त्यांची भूमिका जाणून घेतली.
कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर हे अपेक्षेप्रमाणे हद्दवाढीसाठी आग्रही असल्याचे, तर कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक व करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांचा मात्र विरोध असल्याचे स्पष्ट झाले. मूळ शहराचा विकास करा मगच हद्दवाढ करा, अशी त्यांची भूमिका आहे. पक्ष कोणताही असला तरी दक्षिण व करवीरच्या आमदारांची भूमिका कायम अशीच राहिली आहे. हद्दवाढीचे समर्थन करणे त्यांना राजकीयदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे त्यांची हीच भूमिका कायम असेल. ती गृहीत धरूनच राजकीय इच्छाशक्ती वापरली तरच हद्दवाढ होऊ शकते, अन्यथा ये रे माझ्या मागल्याप्रमाणे प्रश्नाचे गुऱ्हाळ कायमच सुरू राहील.
विरोधासाठी विरोध नको
हद्दवाढीला याचा विरोध आणि त्याचा विरोध, असे होता कामा नये. पुण्यासारख्या शहरांनी सातत्याने हद्दवाढ केल्यामुळे आज या शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. कोल्हापूर शहरावर मर्यादा आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. म्हणूनच ग्रामीण भागाला उत्तम सुविधा देऊन त्यांना शहरात सामावून घेण्याची गरज आहे, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
फडणवीस, शिंदे यांच्याकडे निधीची मागणी
एकीकडे शहरातील प्रश्न संपवत असताना दुसरीकडे प्राधिकरणाला मोठा निधी देऊन त्या माध्यमातून गावातील सोयीसुविधा उत्तम करणे आणि त्यांना शहरातील सुविधांच्या बरोबरीने आणणे महत्त्वाचे आहे. प्राधिकरणाला निधी देऊन त्या माध्यमातून गावागावांत विकासकामे झाली पाहिजेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली आहे. - आमदार अमल महाडिक
लोकसंख्येची अट रद्द, मग अट्टाहास का?
काही मंडळी शहराची लोकसंख्या कमी असल्याने विकासनिधी मिळत नसल्याचे सांगत आहेत. पण, केंद्र सरकारने ही अट यापूर्वीच रद्द केली आहे, मग हद्दवाढीसाठी अट्टाहास का? अशी विचारणा आमदार नरके यांनी केली. करवीरमधील ४२ गावांसाठी प्राधिकरण तयार केले, त्या माध्यमातून शहराशेजारील गावांचा विकास करण्याचे नियोजन आहे. पण, त्यातून किती विकास झाला? अशी विचारणाही आमदार चंद्रदीप नरके यांनी केली.
हद्दवाढीला २० गावांचा विरोधच !
उचगाव : वीस गावांना विश्वासात न घेता हद्दवाढीचा निर्णय घेतल्यास या गावांतील ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. यापुढेही हद्दवाढीला तीव्र विरोधच राहील, असे उजळाईवाडी ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीत हद्दवाढ विरोधी कृती समितीचे कार्याध्यक्ष सरपंच उत्तम आंबवडे व समितीचे अध्यक्ष उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण यांनी स्पष्ट केले.
यावेळी उत्तम आंबवडे म्हणाले की, पालकमंत्री यांना भेटून हद्दवाढ का नको, तसेच शहराचे मूलभूत प्रश्न सोडविण्यास महानगरपालिकेला येत असलेले अपयश, हद्दवाढीचा घाट घालून ग्रामस्थांचे हाेणारे नुकसान हे निर्दशनास आणून देऊ. याबरोबर कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक आणि करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनाही भेटून हद्दवाढ कृती समिती आपली भूमिका मांडणार आहे.
बैठकीसाठी सरनोबतवाडीच्या सरपंच शुभांगी अडसूळ, पाचगावच्या सरपंच प्रियांका पाटील, सुमन गुरव, गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील, रूपाली पाटील, उपाध्यक्ष नारायण गाडगीळ, तंटामुक्ती अध्यक्ष नायकू बागणे, किरण अडसूळ, राहुल पाटील, चंद्रकांत डावरे, ए. व्ही. कांबळे, संदीप पाटोळे, रूपाली कुसळे, अमर मोरे, रसिका पाटील यांसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामविकासात ग्रामपंचायतीला १५ वित्त आयोगातून निधी उपलब्ध होत आहे. अन्य निधीतून गावचे मूलभूत प्रश्न सोडविले जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत उचगाव हद्दवाढीत जाणार नाही, कायम विरोधच राहील.- मधुकर चव्हाण, सरपंच, उचगाव