कोल्हापूर हद्दवाढ : आधी शहराचा विकास करा, मग हद्दवाढीवर बोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 11:43 AM2022-02-07T11:43:35+5:302022-02-07T11:46:10+5:30

दोन मंत्री असूनही कोल्हापुरात आयटी पार्क झाला नाही. येथील बेरोजगारांना नोकरीसाठी पुण्यात जावे लागते. यामुळे आधी आयटी पार्क विकसित करा, मग हद्दवाढीचा विचार करू

Kolhapur Boundary Extension First develop the city, then talk about boundary extension | कोल्हापूर हद्दवाढ : आधी शहराचा विकास करा, मग हद्दवाढीवर बोला

कोल्हापूर हद्दवाढ : आधी शहराचा विकास करा, मग हद्दवाढीवर बोला

googlenewsNext

कळंबा : हद्दवाढ समर्थक आणि विरोधकांतील परस्पर विरोधी विचार, आधी शहराचा विकास करा, मग हद्दवाढीवर बोला, अशी सरपंचाची भूमिका, हद्दवाढ विरोधातील घोषणा आणि फलकबाजी अशा गोंधळाच्या वातावरणात रविवारी हद्दवाढ कृती समितीतर्फे शहरालगत असलेल्या कळंबा येथे आयोजित समन्वय बैठक पार पडली. यावेळी कृती समितीतर्फे हद्दवाढ फायद्याचीच आहे, असे सांगितले. येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी ग्रामस्थांचा हद्दवाढीला तीव्र विरोध केल्याने संवादाऐवजी विसंवाद वाढला. शेवटी बैठक गुंडाळली.

बैठकीत कृती समितीचे निमंत्रक ॲड. बाबा इंदूलकर यांचे भाषण सुरू असताना माजी सरपंच विश्वास गुरव यांनी हद्दवाढ विरोधातील मत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दोन मंत्री असूनही कोल्हापुरात आयटी पार्क झाला नाही. येथील बेरोजगारांना नोकरीसाठी पुण्यात जावे लागते. यामुळे आधी आयटी पार्क विकसित करा, मग हद्दवाढीचा विचार करू असे गुरव यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी हस्तक्षेप करीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याची संधी दिली जाईल, असे स्पष्ट केले.

पण गुरव आक्रमकपणे आपली भूमिका मांडत राहिले. त्यावेळी इंदूूलकर, आर. के. पोवार यांनी सरपंच बोलल्यानंतर तुम्ही बोला, मध्येच बोलू नका, असे सूचित केले. तरीही गुरव ऐकण्याच्या मानसिकतेत नसल्याने ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ शिंदे, संग्राम चौगुले आदींनी त्यांना बैठकीतून बाहेर घेऊन गेले.

माजी नगरसेवक अनिल कदम बैठकीत शांतता राखण्याचे आवाहन करीत होते. यामध्येच सरपंच भोगम यांनी हद्दवाढीच्या विरोधात भाषण केले. ते हद्दवाढ विरोधातील ग्रामसभेचे सर्व ठराव पोवार यांना देण्यासाठी गेले. पण पोवार यांनी ते ठराव न घेता जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा सल्ला दिला. पोवार यांनी ठराव न घेतल्याने सरपंच भोगम, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आक्रमक झाले. ते बैठकीतून बाहेर पडत हद्दवाढ विरोधी घोषणा दिल्या. बैठकच गुंडाळल्याने हद्दवाढ कृती समितीचे पदाधिकारीही निघून गेले.

बैठकीस हद्दवाढ कृती समितीचे पदाधिकारी माजी महापौर सुनील कदम, बाबा पार्टे, माजी नगरसेवक महेश उत्तुरे, विजय जाधव, सुभाष देसाई, कुलदीप गायकवाड, शुभांगी साखरे, अलका सणगर, किशोर घाटगे, उपसरपंच अरुण टोपकर, माजी पंचायत समिती सदस्य रंगराव तिवले, बाजीराव पोवार, राजू तिवले, सर्जेराव साळुंखे, दिलीप पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

पेढा गोड झालाच नाही

पोवार यांनी बैठकीच्या सुरुवातीला सरपंच भोगम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत पेढा भरवला. बैठकीतून गोड निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केल; पण बैठकीत गोंधळ झाल्याने पेढा गोड झालाच नाही.

महापालिकेच्या सेवा, सुविधा घ्यायच्या आणि हद्दवाढीला विरोध करायचे हे चुकीचे धोरण आहे. शहर आणि लगतच्या गावांचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. गावांनी हद्दवाढीत समाविष्ट व्हावे. - आर. के. पोवार, हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक
 

हद्दवाढ न झाल्याने शहराचा अपेक्षित विकास झाला नाही. हद्दवाढ झाल्यास ग्रामीण भागांचाही समतोल विकास होणार आहे. विरोधाला विरोध न करता ग्रामस्थांनी हद्दवाढीचे फायदे समजून घ्यावेत. बैठकीत काही ग्रामस्थांचा विरोध झाला तरी सकारात्मक चर्चा झाली. - ॲड. बाबा इंदूलकर, कॉमन मॅन

शहराच्या उपनगरांचा विकास झालेला नाही. याउलट कळंबा गावास विविध योजनेतून निधी मिळत आहे. त्यातून विकास केला जात आहे. म्हणून हद्दवाढीस ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. -सागर भोगम, सरपंच, कळंबा

Web Title: Kolhapur Boundary Extension First develop the city, then talk about boundary extension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.