चेंबर ऑफ कॉमर्स फॉर रुरल वूमेनची कोल्हापुरात शाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:22 AM2021-03-20T04:22:42+5:302021-03-20T04:22:42+5:30
कोल्हापूर : महिला उद्योजकांकडे महत्त्वाकांक्षा, नवोन्मेष आणि कामावर प्रेम करण्याची वृत्ती असली, तरी अन्य अनेक बाबींमुळे त्यांच्या पुढे जाण्यात ...
कोल्हापूर : महिला उद्योजकांकडे महत्त्वाकांक्षा, नवोन्मेष आणि कामावर प्रेम करण्याची वृत्ती असली, तरी अन्य अनेक बाबींमुळे त्यांच्या पुढे जाण्यात अडचणी निर्माण होत असल्याने चेंबर्स ऑफ कॉमर्सने रुरल वूमेन संकल्पना आणली. त्याचा विस्तार सुरू झाला असून त्यातील एक शाखा आता कोल्हापुरात सुरू होत आहे. माणदेशी फाउंडेशन आणि मास्टरकार्ड यांनी ही विस्ताराची घोषणा केली आहे.
या विस्तारामुळे सदस्यांना डिजिटल कौशल्ये व ज्ञान अधिक प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल, कायदेशीर सल्ला सेवा तसेच मार्केटिंग क्लिनिक्सची सेवा उपलब्ध होऊ शकेल, महिला उद्योजकांमधील विक्रीचे जाळे भक्कम होईल आणि या महिला उद्योजकांना परिवर्तनाचे दूत होण्याचा मार्ग खुला होईल. महाराष्ट्रातील पुणे, चिपळूण आणि सातारा या शहरांमध्ये चेंबरच्या शाखा पूर्वीपासून आहेत आणि त्यांच्या माध्यमातून २०१८ पासून १० हजार स्त्रियांना लाभ मिळाला आहे. या विस्ताराच्या माध्यमातून २० हजारहून अधिक छोट्या व्यवसायांना सोर्सिंग व विक्रीच्या डिजिटल नेटवर्क्सचा लाभ देऊन सबळ करण्याचे उद्दिष्ट चेंबरपुढे आहे.
कोट ०१
“महिला उद्योजक त्यांचा व्यवसाय वाढवण्यास व विस्तारण्यास उत्सुक आहेत, आपल्या महत्त्वाकांक्षा व स्वप्ने पूर्ण करायची इच्छा त्यांना आहे आणि त्यांना स्वत:साठी तसेच स्वत:च्या कुटुंबासाठी सुरक्षित भविष्यकाळही घडवण्याची इच्छा आहे. त्यांना परवडण्याजोग्या वित्तपुरवठ्याची, मदत करणाऱ्या नेटवर्क्सची आणि बाजारपेठेबद्दलच्या ताज्या माहितीची गरज आहे.
-चेतना सिन्हा,
संस्थापक, माणदेशी फाउंडेशन